सोलापूर : शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माजी महापौर महेश कोठे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीत प्रवेश न मिळणे हे अनपेक्षित असताना दुसरीकडे कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी झाली आहे. नजीकच्या काळातही कोठे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाल्यामुळे त्यांची राजकीय कोंडी झाली आहे.

कोठे यांची राजकीय अडचण वाढण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची व्यूहरचना कारणीभूत असल्याचे मानले जाते. शिंदे आणि कोठे यांच्यात राजकीय कटुता सर्वश्रुत आहे. तर त्याचवेळी शिंदे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी असलेला वैयक्तिक जिव्हाळाही सर्वज्ञात आहे.

दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुद्दय़वर हात वर केले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता सांभाळताना तिन्ही पक्षांना आघाडी धर्माचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोठे यांची राजकीय अडचण असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.

यापूर्वी काँग्रेस व नंतर शिवसेना आणि नंतर शिवसेना बंडखोर म्हणून सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवूनही कोठे यांना आमदारकीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आता पुन्हा आमदारकीची अपेक्षा बाळगून कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्वत: जाहीर करताना त्यांनी यासंदर्भात शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचाही दावा केला होता. त्यानुसार मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी कोठे आपल्या समर्थकांसह मुंबईला गेले होते. परंतु त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला ऐनवेळी ‘खो’ बसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी पुण्यात यासंदर्भात घडामोडी झाल्या. मात्र कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील मिळू शकला नाही.