संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी संध्याकाळी जालना येथून श्रीकांत पांगारकर याला अटक केली. पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक होता.

नालासोपारा स्फोटके प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जालना येथून श्रीकांत पांगारकरला शनिवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.

पांगारकरच्या अटकेने जालन्यात खळबळ उडाली आहे. पांगारकर हा दोन वेळा शिवसेनेचा नगरसेवक होता. तर त्याचे वडील हे भाजपाशी संबंधित होते, असे सांगितले जाते. पांगारकरचा दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पांगारकरला दुपारी मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.