भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आज येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या काळातील युद्धकथांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य आणि माजी सैनिक संघटना (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला. याचबरोबर १९६२चे भारत-चीन युद्ध, बांगला देशची निर्मिती केलेले १९७१चे ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९९९ च्या कारगील युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या वीरपत्नी, माता-पिता यांच्यासह युद्धात शौर्य गाजवलेल्या निवृत्त जवानांचा या विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ जणांचा त्यामध्ये समावेश होता. तसेच १९६५ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोदूताई जांभेकर विद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १९६५ च्या युद्धाचा वृत्तांत कथन करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर कर्नल सुर्वे आणि सुभेदार अंकुश चव्हाण यांनी अनुभव कथन केले. रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, कर्नल (निवृत्त) शशिकांत सुर्वे, मेजर जगन्नाथ आमरे, कर्नल प्रदीप ढोले, कर्नल सुहास नाईक इत्यादी मान्यवर, तसेच माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.