मनुष्यबळाची कमतरता, प्रश्नपत्रिकांची आणि उत्तरपत्रिकांची सुरक्षितता, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव, पूर्णवेळ परीक्षा विभाग नसणे, परीक्षा विभागात पायाभूत सुविधांचा अभाव आणि वाढत जाणारा कामाचा ताण, अशी अनेक आव्हाने महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत असून परीक्षा विभागातील कामांचे विकेंद्रीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणता येऊ शकतात, असा अहवाल शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सादर केला आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर सर्व विद्यापीठांमधील परीक्षापद्धतींचा अभ्यास करण्यासाठी कुलपतींच्या आदेशाने एक समिती नियुक्त करण्यात आली होती. माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये महाराष्ट्रातील १८ कृषी आणि अकृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि ११ शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील ११ प्रतिनिधींचा सहभाग होता. एक महिन्याच्या कालावधीमध्ये या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला आहे. विविध विद्यापीठांमध्ये सध्या अमलात असणारी परीक्षा पद्धत, परीक्षे संदर्भात विद्यापीठांसमोरील आव्हाने, विविध विद्यापीठांकडून परीक्षा पद्धतीत सुधारणा घडवण्यासाठी केला जाणारा माहिती तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्दय़ांचा समावेश यात करण्यात आला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा पद्धतीचे विकेंद्रीकरण करावे. ज्या महाविद्यालयांना ‘अ’ दर्जा आहे, त्या महाविद्यालयांना त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी द्यावी. या महाविद्यालयांवर लक्ष ठेवण्याचे काम विद्यापीठाने करावे, त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे ऑडिट करावे. इतर महाविद्यालये आणि संस्थांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा विद्यापीठाने घ्याव्यात, असे काही उपाय या समितीने सुचवले आहेत. सध्या परीक्षेदरम्यान होणारे गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटणे अशा अडचणी विद्यापीठांसमोर आहेत. त्याचप्रमाणे भौगोलिक असमतोल, विद्यापीठापासून दूर असलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोचवणे याही अडचणींना विद्यापीठाला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका संचापैकी एक प्रश्नपत्रिका निवडून ती सुरक्षित प्रणालीद्वारे इंटरनेटचा वापर करून परीक्षेच्या एक तास पूर्वी परीक्षा केंद्रावर पाठवण्यात यावी. प्रत्येक केंद्राला एक युझरनेम आणि पासवर्ड देण्यात यावा, त्याच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका संबंधित अधिकारी पाहून त्याच्या प्रिंटआऊट काढून विद्यार्थ्यांना द्याव्यात. विद्यापीठांनी २०१३च्या प्रथम सत्र परीक्षांसाठी ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहावी आणि त्यानंतर या प्रणालीत गरजेनुसार सुधारणा करून २०१४ पासून ती नियमितपणे वापरावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर कुठे करणार?
* विद्यार्थ्यांची नोंदणी आणि परीक्षा पत्राबाबतच्या तक्रारी
* प्रश्न संच आणि प्रश्नपत्रिका संच तयार करणे
* प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित वितरण
* उत्तरपत्रिकांसाठी ओएमआर व बारकोड पद्धतीचा अवलंब
* उत्तरपत्रिकांचे डिजिटल स्कॅनिंग आणि उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रीन पद्धतीने तपासणी
* निकाल तयार करणे आणि जाहीर करणे
* पुनर्मूल्यांकनाचे अर्ज स्वीकारणे
* गुणपत्रकांचे आणि पदवी प्रमाणपत्रांचे वितरण