जिल्हा परिषदेच्या परिचर पदाच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाच्या चौकशीत मिळालेल्या संशयास्पद माहितीच्या आधारे पोलीस पथकाने १७ परीक्षार्थीची माहिती मागवली आहे. या १७ विद्यार्थ्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तपास अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. संबंधित विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून ती तपास अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. या चौकशीदरम्यान अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिचर भरतीप्रकरणी नव्याने परीक्षा घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार १० जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. परंतु, याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळे परिचर पदाच्या परीक्षा तारखेत बदल होऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.