02 March 2021

News Flash

भूकंपभीतीच्या सावटाखाली पालघरमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा!

पालघर जिल्ह्यतील डहाणू, तलासरी तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके बसण्याची मालिका सुरूच आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

नीरज राऊत/विजय राऊत

पालघर जिल्ह्यतील डहाणू, तलासरी तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके बसण्याची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून या भागाला आठ ते १० लहान व मध्यम स्वरूपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून, दोन तालुक्यांतील सुमारे पावणेसहा हजार विद्यार्थ्यांना भीतीच्या सावटाखाली बारावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून २.९ आणि ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपासह इतरही अनेक धक्के बसले. डहाणू तालुक्यातील चार केंद्रांवर ३४९३ आणि तलासरी तालुक्यातील चार केंद्रांवर २२३२ असे एकूण पाच हजार ७२५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसले आहेत. भूकंपसत्रामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

शिक्षण मंडळाच्या नियमानुसार परीक्षा बंदिस्त वर्गखोल्यांमध्ये घेण्यात येणार असल्या तरी भूकंपाची शक्यता लक्षात घेऊन वर्गाचे दरवाजे खुले ठेवणे यासारख्या काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पालघरचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जे.जे. खोत यांनी सांगितले. या दोन तालुक्यांतील परीक्षा केंद्र निवडताना उत्तम बांधकाम असलेल्या शाळा निवडण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास आणि आवश्यकता भासल्यास शाळेच्या आवारात तंबू उभारून तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्याचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

भूकंपाची शक्यता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रे निवडण्यात आली आहेत. भूकंप झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची याची सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थी बसू शकतील इतक्या आकाराचे तात्पुरते तंबू उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जिल्हा प्रशासन व आवश्यक यंत्रणा या भागात सज्ज ठेवण्यात आली आहे.

– डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी पालघर

भूकंपाच्या धक्क्याची मालिका

डहाणू व तलासरी तालुक्यातील भागामध्ये मध्यरात्रीपासून भूकंपाचे १० लहान- मोठे धक्के बसले असून यापकी तीन मध्यम धक्क्यांची नोंद भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. सकाळी १०.१४ वाजता २.९ तीव्रतेचा धक्का, दुपारी १.२४ वाजता पुन्हा २.९ तीव्रतेचा तर पाठोपाठ १.२८ वाजता ३.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:57 am

Web Title: examinations of students in palghar under the earthquake fear
Next Stories
1 सूतगिरण्यांच्या नव्या धोरणांमुळे प्रादेशिक वादाला फोडणी
2 युतीमुळे पश्चिम विदर्भातील समीकरणे बदलणार
3 पक्षांतर्गत विरोध कमी करण्याचा संजय पाटील यांचा प्रयत्न
Just Now!
X