इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील मानवी वसाहतीची साक्ष देणाऱ्या तेर येथील टेकडय़ांचे उत्खनन करण्यासाठी राज्य सरकारने ३४ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास शासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील ऐतिहासिक संदर्भाचे माहेरघर असलेल्या तेरला (तगर) आता नवी झळाळी मिळणार आहे.
राज्य पुरातत्त्व खात्याने संरक्षित पुरातत्त्व स्थळ व राज्य स्मारक म्हणून तेरची १९६७ मध्ये नोंद केली होती. निधीअभावी हा प्राचीन ठेवा मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकोळला गेला होता. उत्खननासाठी मोठय़ा प्रमाणात निधीस मान्यता मिळाल्यामुळे ४४ वर्षांपासून अंधारात असलेले हे प्राचीन वैभव जगासमोर येणार आहे.
राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बठकीत तेर येथील टेकडय़ावर उत्खनन करण्यास चालू आर्थिक वर्षांसाठी ३४ लाख ७२ हजार ३१० रुपयांच्या खर्चास प्रशासकीय, वित्तीय मान्यता दिली. नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व संचालक अन्वेषण विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर तेर येथील उत्खननास सुरूवात होणार आहे. या साठी नियंत्रण अधिकारी म्हणून पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या संचालकांची नेमणूक केली जाईल अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
दक्षिणेची मथुरा म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावाचा उल्लेख केला जातो. प्राचीन भारतात प्रतिष्ठान म्हणजेच पठण व तगर म्हणजेच तेर या दोन नगरांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून लौकिक होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या महामार्गावर वसलेल्या या दोन्ही शहरांत आजही प्राचीन वैभवाच्या खुणा आढळतात. तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत गोरोबाकाका यांच्या वास्तव्यामुळे तेर राज्यात परिचित आहे. परंतु तेराव्या शतकापूर्वीही अनेक प्राचीन खुणा आजही तेर येथे आढळून येतात.
१९६८ मध्ये म. गो. दीक्षित यांनी तेरच्या पश्चिमेस ग्रामीण रुग्णालयाजवळ गुरांचा गोठा बांधण्यासाठी खोदकाम करीत असताना विटांच्या िभतीचे अवशेष आढळून आले होते. अधिक उत्खनन केल्यानंतर अर्धगोलाकार चत्यगृहाचे अवशेष दिसून आले. या चत्यगृहाची लांबी ९ मीटर व रूंदी साडेपाच मीटर असून, अर्धवर्तुळाकृती भागात सव्वामीटर व्यासाचा स्तूप होता. चत्यगृहासमोर दरवाजा व त्यास लाकडी चौकट होती. दरवाजातून आत जाण्यासाठी तीन पायऱ्याही होत्या. काही काळानंतर चत्यगृहाच्या जमिनीची पातळी भर घालून उंच करण्यात आली. त्यावेळी स्तुपाभोवती २.७ बाय २ मीटर आकाराचा चौथरा बांधण्यात आला, तर लाकडी दरवाजा बुजवून तेथे िभत बांधण्यात आली. नवे प्रवेशद्वार मूळ दरवाजांपेक्षा लहान आकाराचे होते. हा स्तूप विटांच्या चौथऱ्यावर बांधलेला होता. त्याचा काही भाग उद्ध्वस्त झाला होता. चत्यगृहाच्या िभती जाड व त्यातील विटांचे बांधकाम सांधेमोड रचनेचे असल्याने ते मजबूत स्वरूपाचे आढळून आल्याचे उत्खनन अहवालात दीक्षित यांनी नमूद केले आहे. विटांचा वापर करून बांधलेली चत्यगृहे भारतात तुरळकच आढळतात.
१९६८ मध्ये सुस्थितीत असलेले चत्यगृहाचे अवशेष आता ढासळल्याचे दिसून येत आहे. उत्खननानंतर लगेच या अवशेषांचे जतन करणे अत्यावश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे तेर येथील चत्यगृहाच्या अवशेषांबरोबरच गोरोबाकाका यांचे राहाते घर व अन्य १२ राज्य संरक्षित पुरातत्त्व स्थळे आजही दुर्लक्षित आहेत.
संरक्षित स्थळ घोषित, जतनाकडे डोळेझाक!
राज्य पुरातत्त्व खात्याने एकूण १३ जागांना राज्य संरक्षित पुरातत्त्व स्थळ व संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या निवासस्थानाला राज्य स्मारक म्हणून घोषित केले. वैष्णव अॅपसिडल (त्रिविक्रम मंदिर) १९५३ मध्ये, बराग पांढर, किसन मस्के यांचे शेत, बराग पांढर, गावठाण (रेणुका टेकडी), माधव चारी यांचे शेत, गोिवद चारी यांचे शेत, गोदावरी टेकडी, कोट एरिया, महार टेकडी, मुलास टेकडी या जागांना १९७६ मध्ये, केशव व्यास यांच्या शेतातील तीर्थकुंड १९९७मध्ये, उत्तरेश्वर मंदिरास २००१मध्ये पुरातत्त्व स्थळ म्हणून घोषित केले, तर गोरोबाकाका यांच्या निवासस्थानास २००६ मध्ये राज्य स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले. या प्राचीन वैभवास राज्य पुरातत्त्व खात्याने संरक्षित करून मोठा कालावधी लोटला, तरीदेखील त्याचे जतन, संवर्धन व सुशोभीकरण निधीअभावी होऊ शकले नव्हते.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?