औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यांत अतिवृष्टी आणि घाटातील भूस्सखलानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य शासनाच्यावतीने मुंबईतील सह्याद्रीचा आतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प आहे. काही भागात पाण्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा राज्य शासनाच्यावतीने आज आढावा घेण्यात आला. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. कन्नड तालुक्यांचे आमदार यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी तत्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पीडित नागरिकांना तत्काळ जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

कन्नड घाटात प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. औरंगाबाद- धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात रुतल्या आहेत. रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. घाट भागात मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे कामात अडचण येत आहे. या मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – चाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान! ६०० जनावरे वाहून गेली; १० लोकांच्या मृत्यूची शक्यता

औरंगाबाद – चाळीसगाव मार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे जाण्यासाठी पर्यायी घारगाव रस्ता वापरावा, तर औरंगाबादहून येण्यासाठी अजिंठा-जळगाव महामार्ग वापरावा, असे चाळीसगाव येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक भागवत पाटील यांनी सांगितले.