शुक्रवारी साजरा होणाऱ्या गटारीच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू व अवैध दारू विक्रीविरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी १२ ठिकाणी छापे टाकून २ लाख ५५ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रायगड जिल्ह्य़ात १२ ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील बेकर, तळा तालुक्यातील दापोली, रुमटे, बोरघर, अलिबाग तलुक्यातील दागेस्तान, मुटे, रोहा तालुक्यातील मेढे येथे गावठी दारूच्या गुत्त्यांवर छापे टाकण्यात आले. माणगाव तालुक्यातदेखील कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत ६ हजार ७१२ बल्क लिटर रसायन, १ हजार ६८० बल्क लिटर गावठी दारू असा एकूण २ लाख ५५ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  जुल महिन्यात रायगड जिल्ह्य़ात गावठी दारू व अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करून १२७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ३७ जणांना अटक करण्यात आली होती. ३७० किलो काळा गूळ, ६९ हजार १३३ बल्क लिटर रसायन, १ हजार १९१ बल्क लिटर गावठी दारू, ८३ बल्क लिटर अवैध देशी दारू, ३१ बल्क लिटर विदेशी दारू , दोन कार, एक अ‍ॅक्टिवा, दोन मोटारसायकल असा एकूण २४ लाख ५६ हजार ६७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
रायगड जिल्हा उत्पादनशुल्क विभागाला २०१५-२०१६ या आíथक वर्षांसाठी ७१५ कोटी रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील चार महिन्यांत १९६ कोटी ५ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादनशुल्क विभागाचे रायगड जिल्हा अधीक्षक नीलेश सांगडे यांनी दिली.
गटारी अमावास्या आणि दारू हे एक समीकरण बनले आहे. गेल्या काही वर्षांत गटारी अमावास्येच्या कालावधीत दारू विक्रीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून आहे आहे. ही बाब लक्षात घेऊन गावठी आणि अवैध दारू वाहतुकीविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज, १४ ऑगस्टला गटारी साजरी केली जाणार आहे. त्या वेळी अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक करावाई केली जाणार आहे. वाहनांची तपासणी केली जाणार आहे, असे नीलेश सांगडे यांनी सांगितले.