उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत साडेतीन हजार लिटर ताडीचा साठा जप्त

पालघर जिल्ह्यासह वसईच्या विविध भागात शिळ्या ताडीची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पालघर आणि ठाणे विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून साडेतीन हजार लिटर शिळ्या झालेल्या ताडीचा साठा जप्त केला आहे.

निवडणुकीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर मद्यविक्री केली जात असते. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू असते. मात्र वाढती मागणी लक्षात घेऊन शिळ्या झालेल्या ताडीचा पुरवठा करण्यात येत आहे. ही शिळी ताडी आरोग्याला अपायकारक असते. त्यामुळे राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या ठाणे आणि पालघर विभागाने या विरोधात कारवाई सुरू केली आहे. वसईतील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी असलेल्या अवैध ताडी साठय़ावर छापे टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये शिळ्या झालेल्या ताडीचे कॅन आढळून आले असून दोन हजारांहून अधिक लिटर शिळी झालेली ताडी यावेळी जप्त करण्यात आली आहे. नाळा येथील ताडी विक्रेते वीरेंद्र म्हात्रे हे आपल्या घराजवळ उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये ताडीचे कॅन भरत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. यामध्ये जमा करण्यात आलेली ताडी खूप दिवसांपासूनची असल्याचे दिसून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वसईसह पालघरच्या विविध ठिकाणी ताडी-माडीची विक्री केंद्रे आहेत, तर विविध भागांत ताडी काढून त्याचा पुरवठा मुंबईसारख्या ताडी विक्रीच्या दुकानांत केला जातो. मात्र काढण्यात येणारी ताडी अधिक काळ साठवून मुंबईत पाठवली जात आहे. पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन, निरीक्षक दिलीप बामणे, दुय्यम निरीक्षक एस. पी. मोहिते शैलेश शिंदे तसेच ठाणे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.