राज्यात मोठय़ा प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील सुमारे ९४७ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असून या विभागातील निरीक्षक संवर्गातील मंजूर २५२ पदांपैकी तब्बल १२२ पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढला असून परप्रांतातून येणारा मद्याचा ओघ रोखण्याचे आव्हान उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणाच नाही, अशी ओरड आता सुरू झाली आहे. आहे तेवढे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून दारू उत्पादनावर लक्ष ठेवणे व बेकायदा दारूविक्रीवर कारवाई केली जात आहे. बनावट दारूविक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस दलासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही आहे. तक्रारीनंतर पोलीस कारवाई करतात. अनेक वेळा अवैध दारू अड्डय़ांवर पोलिसांकडून छापे टाकले जातात, पण उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा यात मागे आहे. त्यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पुरेसे कर्मचारी व वाहने नाहीत. निरीक्षक, दुय्यम निरीक्षक ही महत्वाची पदे रिक्त आहेत. याशिवाय, लिपिकांचीही संख्या कमी आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता अवैध मद्यविक्री व निर्मितीला आळा घालण्यासाठी अनेक मर्यादा येत आहेत. मोठी कारवाई करण्यासाठी गेल्यावर आरोपी पळून जातात. केवळ मुद्देमाल जप्त केला जातो, त्यामुळे पूर्णपणे हातभट्टी, अवैध दारूविक्रीचे व्यवसाय बंद होत नाहीत.

उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी महसुलात वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षांपेक्षा २०१५-१६ मध्ये महसुलात ९.४१ टक्क्यांची वाढ दिसून येते. निरीक्षक संवर्गातील ५० पदांवर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आले असून नामनिर्देशनाच्या कोटय़ातील रिक्त पदांपैकी ३०० पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याच्या हालचाली आता सुरू आहेत, पण इतर संवर्गातील पदे भरण्यावर शासनाचे र्निबध कायम आहेत.

अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावरही होऊ लागला आहे. उत्पादन शुल्क विभागाने बनावट विदेशी मद्य आणि हातभट्टी दारू उत्पादन प्रकरणी आतापर्यंत ४२ हजार ३२९ जणांवर कारवाई केली आहे, पण अजूनही २१ हजार २३७ गुन्ह्यांचा तपासच लागू शकलेला नाही. या विभागाने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ४२ हजार ३२९ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी २१ हजार २३७ गुन्हे बेवारस आहेत. वारस गुन्ह्यांमध्ये म्हणजे ज्या छाप्याच्या कारवाईत आरोपी सापडले तेथून २१ हजार ४६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये आतापर्यंत ७२.६८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात वाहने, हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन व साहित्य, मोहफुले, स्पिरिट इत्यादी बाबींचा समावेश आहे. हातभट्टी दारूनिर्मिती बहुतांश नदी, ओढे, नाले, तसेच डोंगराळ, दुर्गम भागात अडचणीच्या ठिकाणी केली जाते. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी तेथे पोहोचेपर्यंत संबंधित आरोपी पळून गेलेले असतात.

तेथे दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत मुद्देमाल जप्त करण्यात येतो आणि बेवारस गुन्हा नोंदवला जातो, असे उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.