आच्छाड, उधवा, झाई मार्गावर उत्पादन शुल्क विभागाची गस्त

डहाणू : लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात दमण बनावटीच्या मद्याची तस्करी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आच्छाड, उधवा, झाई मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे करडी नजर असणार आहे. या विभागाची मुंबईतील दोन पथके आणि स्थानिक कर्मचारी येथे तैनात करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र- गुजरात सीमा भागातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतून मोठय़ा प्रमाणात दमण बनावटीच्या मद्याची अवैध तस्करी केली जाते. लोकसभा निवडणुका आणि लग्नसराई लक्षात घेता आतापासून या हालचालींना वेग येणार आहे. दमण येथे विविध नामांकित ब्रॅण्डच्या नावाचा वापर करून बनावट मद्य तयार केले जाते. ते गुजरातमार्गे महाराष्ट्रात पाठवली जाते. याकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांचा वापर केला जातो. त्यांना या परिसराची खडानखडा माहिती असते. गुजरात राज्यात दारूबंदी असताना या परिसरातून तस्करी होत असल्याने या अवैध व्यवसायाला पाठबळ मिळत आहे.

ही मद्य तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील तलासरी तालुक्यातील आच्छाड, उधवा तर किनारपट्टीलगत झाई येथील चोरटय़ा मार्गाचा वापर तस्कर करतात. रात्री किंवा पहाटे त्यांची वाहने महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर गुप्त मार्गाने जंगलात जातात. तिथे हा माल उतरविला जातो. त्यानंतर त्याचे वितरण पालघर, मुंबई, रायगड या भागात केले जाते. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी तलासरीतील जंगलपट्टी भागात रात्रीच्या सुमारास दारूसाठा उतरवला जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यांनी छापा टाकला, मात्र या पथकावर दगडफेक करण्यात आली होती.

अवैध तस्करीविषयी खबर मिळाल्यास कारवाई करण्यात येईल. मुंबई- अहमदाबाद महामार्ग, उधवा, झाई व तलासरी या ठिकाणांवर विशेष लक्ष असेल.

-ए. व्ही. सोनावणे, प्रभारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डहाणू