“मी ब्राह्मण आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पण पवारांना वारंवार याचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे,” असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांना लगावला आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी जातीचं राजकारण करणाऱ्या विरोधीपक्षांचा समाचार घेतला.

शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये भाजपा आणि फडणवीस यांना सत्तेचा गर्व चढला होता अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. त्यावरुनच लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदिप आचार्य यांनी फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. “जिल्हा परिषदा असो किंवा महानगर पालिका निवडणुका असो गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीचा पाया तुम्ही राज्यामधून जवळपास उखडून टाकला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणून शरद पवारांनी त्यांनी आपल्या टीकेतून कुठेतरी तुमच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे असं वाटतं का?,” असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. याच प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी पवारांचे नाव घेत थेट टीका केली.

“तुम्ही फडणवीस म्हणून एक फार बोलक्या प्रकारचा शब्द वापरला आहे. पाच वर्षामध्ये मी काय केलं, काय नाही केलं किंवा मी नेता झालो की नाही झालो किंवा मला लोकं मानतात की नाही मानतात हे ठाऊक नाही. पण माझ्या नेतृत्वाचं एकच यश आहे ते म्हणजे पवारसाहेब हे पुरोगामी नेते असूनही त्यांना प्रत्येक वेळी माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते. ते थेट उल्लेख करु शकत नाही पण अप्रत्यक्षरित्या अनेकदा त्यांना माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते हे माझं यश आहे. हो आहे मी ब्राह्मण. संपूर्ण दुनियेला माहितीय मी ब्राह्मण आहे. त्यामुळेच त्यांना माझ्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची नाही पण प्रत्येक वेळेस जातीची आठवण जरुर करु द्यावी लागते,” असे टोला फडणवीस यांनी प्रश्नाचे उत्तर देताना लगावला. “आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्येही पवारांनी अप्रत्यक्षपणे जातीची आठवण करुन दिली. लोकांनी मला आहे तसं स्वीकारलं आहे. मला खरोखर असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय पटावर मी निश्चित माझं काहीतरी स्थान मिळवलं असेल अन्यथा वारंवार अडून अडून मी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज पवारसाहेबांना तरी पडली नसती,” असंही फडणवीस पुढे बोलताना म्हणाले.

“पवारच नाही तर माझ्या जातीचा उल्लेख बऱ्याच लोकांनी केला. आमच्या विरोध कांची आयुधं संपतात तेव्हा ते जातीवर येतात. माझं मत असं आहे की जात नेत्यांच्या मनात असते ती जनतेच्या मनात नसते,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संपूर्ण मुलाखत पहा-

तसेच सत्तेचा गर्व या टीकेवरुन पवारांना उत्तर देताना फडणवीस यांनी, “आम्ही ज्या ठिकाणाहून आलो आहोत ते पाहता सत्ता आमच्या डोक्यात जाऊ शकत नाही,” असं मत व्यक्त केलं आहे.