राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार ३२४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून १३ कोटींचे उपचार केले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.
    राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत पलूस येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित केलेल्या सर्व रोग निदान व उपचार शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.  समारंभास जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव कदम, सभापती यास्मीन पिरजादे, पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र लाड आदी उपस्थित होते.
    गोरगरीब जनतेला दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याची सुविधा राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपलब्ध झाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सेवा सर्वसामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यादृष्टीने आरोग्य सेवेवर अधिक भर देण्यात आला आहे.  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पिवळे, केसरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थीना विविध प्रकारच्या ९७२ आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  या योजनेचा विमा हप्ता शासन भरत असल्याने रुग्णांना कोणतेही मूल्य आकारले जात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  
 जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने पुरवठा विभागाने नियोजन करण्याची सूचना करून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, गरजू व गरीब लोकांना ३ रुपये दराने तांदूळ, २ रुपये दराने गहू आणि १ रुपया दराने ज्वारी,बाजरी देण्यात येत असून जिल्ह्यातील १९ लाख लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला असल्याचेही ते म्हणाले.