सार्वजनिक बांधकाम विभागातील आणखी एक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. बुधेश रंगारी असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते पनवेल येथे मार्ग विकास विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. ठेकेदारांनी केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी ७३ हजार रूपयांची लाच घेताना बुधेश रंगारी यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. रंगारी याच्या खारघर येथील फ्लॅटमध्ये तब्बल १ कोटी २८ लाख रूपये सापडले असून बेलापूरातील एका बँकेत असलेले त्याचे लॉकर सील करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असताना रायगड जिल्ह्यात सापडलेला हा तिसरा लाचखोर आहे. यासंदर्भात नवीन पनवेल येथील एका ठेकेदाराने तक्रार दिली होती. हा ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाकडील लहान मोठ्या बांधकामांचे ठेके घेत असतो. परंतु त्याचा परवाना संपलेला असल्याने त्याने आपला मित्र असलेल्या ठेकेदाराच्या नावावर पनवेल येथील शासकीय विश्रामगृहाच्या शेडची दुरूस्ती (३ लाख ७७ हजार ५७७ रूपये) व महिला विश्रांती कक्ष दुरूस्ती (४ लाख ६९ हजार ७६७ रूपये) ही कामे पूर्ण केली.
ही दोन्ही बिले कार्यकारी अभियंता बुधेश रंगारी यांनी काढली असल्याने हा ठेकेदार त्यासंदर्भात रंगारी यांच्या कार्यालयात गेला असता रंगारी यांनी या दोन बीलांपैकी ३ लाख ७७ हजार ५७७ रूपयांचे एकच बिल काढून त्याचा धनादेश बँकेत जमा करण्यासाठी पाठविला असून त्याचे २० टक्के प्रमाणे ७५ हजार रूपये इतकी रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर या ठेकेदाराने तक्रार केली.
मंगळवारी याची पडताळणी केली असता रंगारी यांनी २ हजार रूपये कमी करून ७३ हजार रूपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच सापळा रचण्यात आला व ७३ हजार रूपयांची लाच घेताना रंगारी याला रंगेहात पकडण्यात आले. रंगारी याच्या केबिनमध्ये झडती घेतली असता त्याच्या ब्रिफकेसमध्ये १ लाख १५ हजार रूपये रक्कम आढळून आली. खारघर येथील त्याच्या फ्लॅटमध्ये तब्बल १ कोटी २८ लाख रूपये सापडले आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे उपअधिक्षक सुनील कलगुटकर यांच्यासह पोलीस निरीक्षक गोरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.