गारपिटीने अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे, अशी मागणी वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे. शेतकरी संकटात आहे. संकटसमयी सांत्वन करण्यापेक्षा सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
वाशी तालुक्यास अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर तालुक्यास गारपिटीचा तडाखा बसला. पूर्वी कधीच असे संकट ओढवले नव्हते, असे जुन्या मंडळींचे म्हणणे आहे. मोठय़ा आशेने टरबूज लागवड केली. त्याला ठिबक सिंचन बसविले. अहोरात्र परिश्रम घेतले. वेळोवेळी खते, औषधे देऊन पीक फुलविले. परंतु गारपिटीने टरबुजाच्या वेलीची पाने पूर्ण झडली. टरबुजावर गारांचा मारा झाला आणि संपूर्ण पीक होत्याचे नव्हते झाले. ज्या पिकाकडे पाहून प्रसन्न वाटत होते, त्याच पिकाची बिकट स्थिती पाहून अश्रू ढाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
टरबूजच नव्हे, तर काकडी, मोसंबी, आंबा, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकेही भुईसपाट झाली. नुकसानीचे पंचनामे करावयास आलेल्या केंद्रीय पथकाने तालुक्यात केवळ वाशी येथेच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीबद्दल सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार करून शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.