News Flash

स्वबळासाठी ‘अवसान’ शोधताना काँग्रेसचीच कसरत

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवा, असा जोरदार सूर निघण्याची शक्यता आहे.

| July 26, 2014 01:40 am

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवा, असा जोरदार सूर निघण्याची शक्यता आहे. या बरोबरच विधान परिषदेत मराठवाडय़ाला डावलल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याने त्याचे पडसादही मेळाव्यात उमटू शकतात. मेळाव्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
विधान परिषदेवर नियुक्ती करताना मराठवाडय़ातील एकाही व्यक्तीचा विचार केला गेला नाही, ही बाब माजी खासदार उत्तमसिंह पवार लक्षात आणून देत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आघाडी उघडल्यासारखे वातावरण आहे. गुरुवारी त्यांनी पत्रकान्वये मुख्यमंत्र्यांवर आरोपही केले. लोकसभेतील पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर फुटले तर बरेच, असे मानणाऱ्यांचा मोठा गट मराठवाडय़ात आहे.  मराठवाडय़ात ४६ पकी १८ आमदार काँग्रेसचे, तर १२ राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, जिल्हानिहाय चित्र मोठे गमतीचे आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेसचे निवडणूक चिन्ह मतदारांच्या विस्मरणात गेल्याचे चित्र आहे. या जिल्ह्यातील परळी मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाचा. तो लातूरचे नेते आवर्जून स्वत:कडे ठेवून घेत. मुंडे-विलासराव ‘मत्र करारा’चा तो भाग मानला जात असे. येथून सातत्याने पराभव पदरी येणार असे गृहीत धरूनच उमेदवारी देण्याची पद्धत होती, हे सर्वश्रुत आहे. अन्य सर्व मतदारसंघांत राष्ट्रवादीच निवडणूक लढते. परिणामी या जिल्ह्यातून काँग्रेसचे चिन्हच मतदार विसरून गेल्याची भावना आहे. ‘तडजोडीमुळे आम्हाला जागा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. जागेची मागणी नेहमी करतोच, पण वरचे नेते लक्षच देत नाहीत,’ या शब्दांत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे यांनी लक्ष वेधले.  
नांदेडमध्ये अशोक चव्हाण एकहाती तंबू पेलून धरतात, इतरांनाही बळ देतात. मात्र, त्यांच्याकडे जबाबदारी नसल्याने सध्या मराठवाडय़ातील काही आमदार व मंत्र्यांमध्ये असणारी नाराजी दबक्या आवाजात चच्रेत असते. अशोकरावांना बळ मिळायला हवे, अशी सार्वत्रिक भावना आहे. या अनुषंगाने बोलताना पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोकरावांकडे राज्याच्या प्रचाराची सूत्रे मिळायला हवीत. दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्षपद मिळावे अशी मागणी तर करणारच आहोत. मेळाव्यातही ही मागणी केली जाईल. मराठवाडय़ाची राजकीय स्थिती व तळागाळातील माणूस त्यांच्या ओळखीचा असल्याने मराठवाडय़ातील उमेदवारीचे सर्व अधिकार त्यांना मिळावेत, अशी मागणी आहेच.
लातूर जिल्ह्यातही काँग्रेसची ताकद मोठी आहे. अमित देशमुख यांना नुकतेच राज्यमंत्रिपद दिले गेले असले, तरी तेथेही नाराजांचा गट सक्रिय झाला आहे. चार आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात नेतृत्वासाठी चढाओढ असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर विलासरावांच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा आहे. तेथे त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता नसल्याचेच सांगितले जाते.
परभणी जिल्ह्यात दोन जागांपकी परभणी मतदारसंघात १९९० पासून एकदाही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर वगळता पक्ष म्हणून ताकद नाहीच, असेच चित्र आहे. जिल्हा बँकेतील घोटाळ्यात बोर्डीकर अडकल्यानंतर काँग्रेसवरील रोषात भरच पडली आहे. त्यामुळे मेळाव्यात काही चर्चा होते का, याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबादमध्ये परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण काँग्रेसचा किल्ला शाबीत राखून असतात. मात्र, त्यांना होणारा राष्ट्रवादीचा विरोध निवडणुकीत अधिक तापदायक ठरणारा असल्याने ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत.
या पाश्र्वभूमीवर औरंगाबादमधील चित्र काँग्रेसची चिंता वाढविणारे ठरले आहे. उत्तमसिंह पवार नाराज असून ते काँग्रेसविरोधात निवडणूक लढविण्यास कंबर कसून आहेत. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. मुस्लिम समाजात त्यांचा दांडगा संपर्क असल्याने त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेळाव्यात त्याचे पडसाद उमटू शकतात. जिल्ह्य़ात काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या अन्य मतदारसंघांतील उमेदवारांचा शोध घेणे हे काँग्रेससमोर आव्हान ठरावे, असे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:40 am

Web Title: exercise of congress for independent election
Next Stories
1 ‘जालना जिल्ह्य़ात अकरा टक्के बालकांचा मृत्यू अतिसारामुळे’
2 ‘खासदारांचा पराक्रम म्हणजे शिवसेनेच्या मस्तीचा परिपाक’
3 लातूरला आजपासून २१ वे नवोदित साहित्य संमेलन
Just Now!
X