23 July 2019

News Flash

न्यूयॉर्कच्या चित्रपट महोत्सवात चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन

भारतातील फाय फौडेशन पुरस्कार विजेते चित्रकार श्रीधर अंभोरे हे सामाजिक आशयाची चित्र निर्मिती करीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

अमेरिकेतील बर्नार्ड कॉलेज (कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या दलित चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवात येथील प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या निवडक चित्रांचा समावेश प्रदर्शनासाठी झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, बोस्टन स्टडी ग्रुप व आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, आंबेडकर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवास निर्माता, दिग्दशर्क पी. रंजित, नागराज मंजुळे, अभिनेत्री निहारिका सिंग, डॉ. डेव्हिड ब्लाँडेल, बोमकु मुरली, जयंत चेरीयन, सुबोध नागदिवे, रामपिला राव यांच्यासह चित्रपट व इतर माध्यमातील जाणकार उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात दलित कलावंतानी निर्माण केलेले दलितांच्या जगण्यातील दाहकता व त्यांच्या आत्मसन्मानासाठी धरलेला आग्रह दाखवण्यात आलेल्या चित्रपट, फोटो व चित्रांचा समावेश आहे.

भारतातील फाय फौडेशन पुरस्कार विजेते चित्रकार श्रीधर अंभोरे हे सामाजिक आशयाची चित्र निर्मिती करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक वाङ्मयीन नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबऱ्यांचे मुखपृष्ठ त्यांनी साकारले आहेत. त्याचबरोबर अनेक दलित, आदिवासी साहित्य संमेलने, मुस्लिम मराठी साहित्य संमेलने, अस्मितादर्श साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलने, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिकात्मक विचारपीठांची त्यांनी कल्पक सजावट केली आहे. विषयानुरूप मुखपृष्ठ निर्मिती करणे हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ आहे. झाडे, प्राणी, पशू, पक्षी, दगड असे फॉर्म वापरून स्वत:ची स्वतंत्र चित्रशैली त्यांनी निर्माण केली आहे. आपल्या विविध चित्रातून मानवी स्वभाव, विकृती, दुर्गुण तसेच पीडित व शोषित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषित माणसांचे चेहरे त्यांनी आपल्या चित्रातून रेखाटले आहेत. त्यांच्या या चित्रनिर्मितीचा अनेक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन गौरवही केला आहे.

First Published on February 17, 2019 1:31 am

Web Title: exhibition of paintings by artist shridhar ambhore at the new york film festival