गुळाला प्रतिक्विंटल ३६०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी झगडणाऱ्या शेतक-यांनी आठवडाभर गुऱ्हाळघरे बंद ठेवल्यानंतर आता नव्या अपेक्षेने गूळ विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणण्यास सुरुवात केली असून, उद्या मंगळवारी आंदोलनानंतरच्या पहिल्या दिवशी गुळाला खरोखरच हमीभाव मिळणार का, याबाबत साशंकता आहे. बाजारात बाजार समितीत सध्या गुळाची आवक अल्प प्रमाणात असल्याने पहिल्या टप्प्यात चांगला दर मिळण्याची शक्यता असली तरी गुळाची आवक वाढल्यानंतर दर घसरण्यास सुरुवात होण्याची शक्यताही असल्याने हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार असून नवा संघर्ष झडण्याची शक्यता आहे. परराज्यात सध्या प्रतिक्विंटल २३०० ते २५०० रुपये दराने गूळ विक्री होत असताना कोल्हापुरी गुळाला ३६०० रुपये भाव का दिला जावा असा प्रतिप्रश्न व्यापारीवर्गातून केला जात आहे. तर साखरेचेही दर उतरत चालले असताना गुळाचे दर वाढणार कसे हाही प्रश्न सतावणारा आहे.
कोल्हापूरचा गूळ देशभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी गुळाची चव न्यारी असल्याने त्याला विदेशातूनही मागणी आहे. मात्र चवदार गूळ बनवणाऱ्या गूळ उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण तुटीचे असल्याने शेतक-यांचे तोंड कडू झाले आहे. गूळ उत्पादन खर्चापेक्षा गूळविक्रीचा खर्च कमी असल्याने गूळ उत्पादक शेतक-यांची संख्याही घटू लागली आहे. एकेकाळी हजाराहूनही अधिक गुऱ्हाळघराच्या चिमण्या अहोरात्र पेटलेल्या असायच्या, पण नुकसानीच्या भयामुळे गुऱ्हाळघरांचा आकडा तीनशेवर पोहोचला आहे.
यंदाच्या गूळ हंगाम सुरू झाला तेव्हा मुहूर्ताचा दर ५ हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेल्याने शेतक-यांना हायसे वाटले. पण हा आनंद अल्पकाळ टिकला. आतापर्यंत बाजार समितीत १ लाख ९४ हजार क्विंटल गुळाची आवक झाली आहे. देशभरातील मागणी पुरवठय़ाचे गणित बदलत गेल्याचा फटका शेतक-यांना बसला. उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून गुजरातमध्ये २३०० ते २५०० रुपये दराने गूळ विकला जाऊ लागला. साहजिकच कोल्हापुरातूनही याच दराने गूळ विकला जावा अशी मागणी परराज्यातील व्यापा-यांकडून होऊ लागली. देशातील गूळदराची खरेदी-विक्री लक्षात घेऊन स्थानिक व्यापा-यांनी गूळ खरेदीची किंमत अडीच हजारावर आणली. यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यातील संघर्षांला तोंड फुटले.
स्थानिक व्यापारी गूळ उत्पादक शेतक-यांची आíथक लुबाडणूक करीत आहेत, असा आरोप होऊ लागला. त्यातूनच गुऱ्हाळघरे बारा दिवस बंद ठेवण्याचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय गूळ उत्पादकांनी घेतला. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यावर शासनाला निर्णय घेणे भाग पडले. पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गूळविक्री बाजार समितीच्या नियमनात राहील असा निर्णय घेऊन शेतक-यांना दिलासा दिला. हमीभावाबाबत मात्र पणनमंत्र्यांनी थेट निर्णय घेण्याचे टाळले. याच वेळी गूळ उत्पादक शेतक-यांच्या आंदोलनात परिस्थितिजन्य अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे पणनमंत्र्यांच्या निर्णयाकडे बोट दाखवत गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेऊन मंगळवारपासून गूळ विक्री बाजार समितीत करण्याचा निर्णय घेतला.  
आठवडाभर गुऱ्हाळघरे बंद ठेवलेल्या गूळ उत्पादकांनी सोमवारी गूळ विक्रीसाठी बाजार समितीत आणला. आज २१७५ क्विंटल गुळाची आवक झाल्याची बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. उद्यापासून गुळाची विक्री केली जाणार असून त्यास हमीभाव मिळतो का, याची चर्चा सुरू झाली आहे. गुळाची आवक कमी झाल्यास मागणी वाढून गुळाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच गुळाची आवक वाढल्यास मागणीत घट होऊन दर घसरण्याची चिन्हेही आहेत. देशभरातील मागणी-पुरवठय़ाच्या या गणितामध्ये गुळाच्या हमीभावाचे नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे.