केंद्रातील सत्ताबदलानंतर माळशेज रेल्वे कृती समितीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नगर-कल्याण रेल्वेमार्गासाठी समितीने राज्यातील सहा केंद्रीय मंत्री आणि सर्व खासदारांना नव्याने प्रस्ताव पाठवला असून, मुंबई ते नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे.
माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की नगर ते कल्याण या माळशेज घाट रेल्वेमार्गासाठी समिती गेल्या सतरा वर्षांपासून प्रयत्नरत आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिलेल्या या रेल्वेमार्गाला पुढच्या पन्नासपेक्षाही अधिक वर्षांच्या काळात मुहूर्त लागलेला नाही. नगर ते कल्याण या मोठय़ा अंतरातील शेती, उद्योगांच्या दृष्टीने विकासाचा महामार्ग ठरणाऱ्या या रेल्वेमार्गाकडे केंद्र सरकारने कायमच दुर्लक्ष केले. नगर ते बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. याचदरम्यान कल्याण ते नगर हा रेल्वेमार्ग झाला तर देशाची पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी या रेल्वेमार्गाने जोडता येईल. मुंबई ते विशाखापट्टणम असा रेल्वेमार्ग त्यामुळे अस्तित्वात येईल.
कल्याण ते नगर रेल्वेमार्गासाठी समिती सातत्याने संघर्ष करीत आहे. गेल्या १७ वर्षांत त्यासाठी अनेक परिषदा, आंदोलने, सभा झाल्या आहेत, मात्र हा रेल्वेमार्ग अद्यापि रुळावर येऊ शकला नाही. मुंबई, पुणे व नगर या परिसराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असलेला हा रेल्वेमार्ग विकासाचा नवा महामार्ग बनेल असा विश्वास हुलावळे यांनी व्यक्त केला. मुंबई-ठाण्याची श्रीमंती, पुण्याची विद्वत्ता आणि नगरचा समृद्ध सहकार असा संगम या रेल्वेमार्गामुळे साधणे शक्य होणार आहे. या पट्टय़ातील शेती, व्यवसाय व उद्योगांनाही त्यामुळे नवसंजीवनी मिळेल. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या रेल्वेमार्गासाठी राज्यातील केंद्रीय मंत्री व खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून येत्या अंदाजपत्रकातच या प्रकल्पाचा समावेश होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन समितीने संबंधित मंत्री व राज्यातील खासदारांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.
 मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन
सन २००८ मध्ये राज्य सरकारने मुंबई-नागपूर (मार्गे पुणे-नगर-नांदेड) अशा देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्राथमिक प्रस्ताव केला होता. त्याचे सर्वेक्षणही झाले होते. हा प्रकल्पही नियोजित नगर-कल्याण रेल्वेमार्गाला जोडता येईल अशी माळशेट घाट रेल्वे कृती समितीची सूचना असून, हे दोन्ही प्रस्ताव समितीने रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना पाठवले आहेत. याबाबत समितीचे शिष्टमंडळ लवकरच त्यांची भेटही घेणार आहे असे हुलावळे यांनी सांगितले.