अभ्यासक्रमात मुलांच्या भावभावनांशी संबंधित विषय गरजेचा; आत्महत्येच्या वाढत्या घटनांनंतर तज्ज्ञांची सूचना

सौरभ अजून मानसिक धक्क्यातून सावरला नाही. एखादा अनामिक फोन आला तरी घेऊ की नको, अशी त्याची अवस्था. कशाचा धक्का बसला त्याला? तर त्याचा जिवलग मित्र सचिन वाघ याने तीन दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्या केल्याच्या घटनेचा. पंधरा वर्षांचा शुभमही अलीकडे काहीसा बुजरा-बुजराच राहतो. महिनाभरापूर्वी त्याच्याही मित्राने गळफास घेतला होता. सौरभपेक्षा शुभमची चिंता अधिक वाटणारी. अगदी कोवळ्या वयात त्याने गणेश नावाचा मित्र गमावला. क्षुल्लक कारणावरून जीवनच संपवावेसे वाटणे ही भावना तशी अविचारातलीच. असे भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र कुठे शिकवले जात असेल? शाळेत तर अभ्यास एके अभ्यास. तेथे भावनेशी संबंधित काही शिकवले जात नाही. अशी यंत्रणा असावी याचा अजून कोणी गांभीर्याने विचार करीत नाही, असे मेंदूविकारतज्ज्ञांचे मत आहे.

मराठवाडय़ात मागील अडीच महिन्यांत १३ ते १९ वर्षांच्या १५ मुला-मुलींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. गतवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत मराठवाडा व बाहेरील काही जिल्ह्य़ांत मिळून २२ मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. या वर्षीच्या १५ आत्महत्या या औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अंबाजोगाई या शहरांमध्ये घडलेल्या आहेत. त्यामागे कारणे काय आहेत? तर शाळेत विशिष्ट पेहराव घालून न आल्यामुळे शिक्षक रागावले, परीक्षेचा पेपर अवघड गेला, अभ्यास झाला नाही किंवा आजारपणामुळे परीक्षेत यश मिळणार नाही, अशा काल्पनिक भीतीतूनही या घटना घडल्याचे समोर आले आहे या आत्महत्या! तर औरंगाबादेत मित्राचीच अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याच्या दोन घटनाही अवघ्या पंधरा दिवसांच्या अंतरात घडल्या आहेत. संकेत कुलकर्णी आणि अजय तिडके या तरुणांचा त्यांचेच एकेकाळी मित्र असलेल्या संकेत जायभाय व मंगेश वायवळ यांनी क्रूरतेची परिसीमा गाठत संपवले. आत्महत्या आणि हत्या, या दोन्ही क्रिया भीती, चिंता, वास्तवापासून दूर नेणारा अविचार, या घडामोडी मेंदूतील भाव-भावनांशी संबंधित आहे. मेंदूतील लिंबिक सिस्टीमच्या यंत्रणेशी संबंधित त्या आहेत, असे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. निरंजन महाजन यांचे मत आहे. डॉ. महाजन यांच्या मते, मेंदूचा पुढचा भाग असतो त्याला फ्रंटल लोग म्हटले जाते. ज्यामध्ये भावनांशी संबंधित हालचाली चालतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची एक शक्ती मेंदूत असते. प्राणी आणि माणूस यांमधील फरक हा याच लिंबिक सिस्टमवर मानला जातो. प्राण्यांमध्ये विचार करण्याची कुवत नसते. त्यांच्या मेंदूची वाढ माणसापेक्षा कमी असते. माणसाचे भावनांवर बऱ्यापैकी नियंत्रण असते. आणि ते जर राखता येत नसेल किंवा सुटत चालले तर आत्महत्या किंवा हत्येसारख्या घटना हातून घडू शकतात.

संवादाचा अभाव

शालेय, महाविद्यालयीन पातळीवर केवळ विद्यार्थ्यांना गुण, यश मिळवण्याची मशीनच म्हणून पाहिले जाते. मुलांच्या भावना, भीती, ताण-तणाव, हट्टी स्वभाव यांचा विचार होत नाही. पालक-मुलगा असा संवाद अलीकडे दुरापास्तच झालेला दिसतो.

समुपदेशन गरजेचे

मुलांच्या भावभावनांचा अभ्यास करणारी समुपदेशनासारखी यंत्रणा शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये आवश्यक आहे. शाळेत एखाद्या प्रश्नावलीच्या माध्यमातून मुलांच्या विचारांचाही अंदाज घेता येतो. उदाहरणार्थ आत्महत्यासारखे विचार येतात का, कशा-कशाची भीती वाटते, काय पाहिले तर ताण जाणवतो, असे काही प्रश्न असतात. नैराश्य आले तर अशा प्रसंगात तणावाचे कसे व्यवस्थापन करावे, याचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय कुटुंबाशी संबंधित मानसोपचार डॉक्टर ही संकल्पना असून त्यातून मुलांना भावनावेगावर नियंत्रण ठेवण्याचे धडे देता येतात, असे डॉ. महाजन सांगतात.

बाल्यावस्था ते पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक समस्यांचा विचार करणारी चाइल्ड अ‍ॅण्ड अ‍ॅलॉडेशन अशा एका शाखेच्या माध्यमातून ते काम चालते. काही ठिकाणी सायकॅट्रिक सोशल वर्कर्स, अशीही यंत्रणा काम करते. आठवडय़ातून एकदा मुलांशी संवाद साधला जातो. पालकांसोबतही चर्चा केली जाते. बिहेविरिअल थेरपी, औषध उपचार केला जातो. त्यानुसार मुलांचे समुपदेशन होते. विचारांची दिशा चुकीची आहे की बरोबर, याचा अंदाज त्यांना आणून दिला जातो. पालक-शिक्षक यांपैकी मुलांना भावना व्यक्त करण्यासाठी मित्रासारखे दुसरे माध्यम नाही. म्हणून मित्रही समुपदेशकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.

– डॉ. निरंजन महाजन, मेंदूविकारतज्ज्ञ