लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवित्र गुरुबाणीत फेरफार करून आपले शब्द घुसडणारे पंजाबचे महसूलमंत्री विक्रमजितसिंग मजिठिया यांनी गुरुवारी लंगरसाहेबमध्ये भांडी धुवून, तसेच गुरुद्वारातील जोडागृहात सेवा करून प्रायश्चित्त केले.
शिरोमणी अकाली दलाचे नेते व पंजाबचे महसूलमंत्री मजिठिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवित्र गुरुबाणीत फेरफार करून आपले शब्द घुसडले होते. गेल्या २५ एप्रिलला पंजाबातील अमृतसर येथे भाजप व शिरोमणी अकाली दल युतीचे उमेदवार अरुण जेटली यांच्या प्रचारसभेत मजिठिया यांनी गुरूमहाराजांच्या शब्दबाणीत आपल्या राजकीय सोयीचे शब्द घुसडून अपमान केला होता. हा प्रकार समजल्यानंतर सर्वप्रथम नांदेडच्या तख्त सचखंड गुरुद्वारा पंचप्यारे साहिबान यांनी त्यांना तनखया (समाजातून बहिष्कृत) घोषित केले होते. नांदेडपाठोपाठ अमृतसरमधील अकाल तख्तनेही त्यांना चारही प्रमुख तख्तावर जाऊन सेवा करण्याचा हुकूम बजावला होता.
नांदेड पंचप्याऱ्यांनी मजिठिया यांना तनखया घोषित केल्यानंतर त्यांनी तत्काळ आपला माफीनामा सादर केला, तसेच अमृतसर, आनंदगुरुसाहिब तख्त, पाटनासाहिब तख्त येथे प्रायश्चित्त करून गुरुवारी नांदेडात दाखल झाले. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी नांदेड विमानतळावर विशेष विमानाने त्यांचे आगमन झाले. गुरुद्वारात पोहोचल्यानंतर मुख्य पुजारी संत बाबा कुलवंतसिंगजी, ज्योितदरसिंगजी, हेडग्रंथी कश्मीरीसिंगजी, मीतग्रंथी भाई विजयेंद्रसिंग कपूर, भाई रामसिंग धुपिया यांनी मजिठिया यांच्या संदर्भात पुन्हा बठक घेऊन त्यांना द्यावयाच्या शिक्षेवर विचार केला. मजिठिया व सहकाऱ्यांनी दुपारी दोनपर्यंत लंगरमधील भाविकांची भांडे घासण्याची सेवा केली. ही शिक्षा भोगल्यानंतर लंगरमध्येच भोजन केले व ते सर्वजण गुरुद्वारातील जोडाघरमध्ये आले. तेथे त्यांनी चापर्यंत भाविकांची जोडेसेवा केली. सायंकाळी त्यांच्या शिक्षेबाबत निर्णय होणार होता.
मजिठिया यांचे आगमन होणार असल्याने पोलिसांनी विमानतळ ते गुरुद्वारा परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. गुरुद्वारा परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. शहर व लगतच्या पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाचारण केले होते. यापूर्वीही अनेक प्रतिष्ठांनी गुरुद्वारात सेवा करून प्रायश्चित्त घेतले होते.