तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला.  तीन कामगार मृत झाले असून अन्य दोन कामगार जखमी झाले आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-३ मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणारी कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला.

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एम- 3 मध्ये असलेल्या गॅलेक्सी सरफॅक्टटंस लि. या कंपनीत सॅनिटायझरसाठी लागणारे कच्चा मालाचे उत्पादन होत असताना हा स्फोट झाला. हायड्रोजन पेरॉक्ससाईडची गळती झाल्याचे सुरक्षा विषयक सूचना मिळाल्यानंतर ते पाहण्यासाठी अधिकारी- कर्मचारी चंबू जवळ पोहोचताच मोठा स्फोट झाला. औद्योगिक वसाहती मधील अधिकांश उद्योग बंद असल्याने या स्फोटाचा आवाज दूर पर्यंत सुमारे पाच किलोमीटर अनंतरवर ऐकू आला. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब व रुग्णवाहिकांनी जखमीना प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. या स्फोटामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जखमी होते असे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी कामगाराला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येत असताना एकाचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. या अपघाताचा तपास औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक संचालनालय व बोईसर पोलीस करीत आहेत.  स्फोट झाला तेव्हा कंपनीत ६६ कामगार काम करीत होते.

मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये समीर खोजा (वय 48) रा.पालघर, विजय सावंत (वय 48) रा.पालघर व रुणाल राऊत रा. पाचमार्ग यांचा समावेश आहे.

आणखी वाचा- लॉकडाउनमध्ये रस्त्याच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरुच; कमान कोसळून तीन मजुरांचा मृत्यू

देश करोनाविषाणूशी लढत असताना बाधित रुग्णांची आणि मृतांची संख्या देखील वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर हँड सॅनिटायझरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून या कारखान्यात उत्पादन सुरु आहे. त्यासाठी कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते.

कंपनीने काय म्हटलं आहे?

“गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लि.मध्ये  गेली चार दशके सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत.

तारापूर M-3 प्रकल्पामध्ये आज झालेल्या लहान इंटरमीडिएट फीड टँक स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने प्रकल्पामध्ये आग लागली नाही. M-3 ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत आणि या घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत देणार आहोत. जे सांगितले जात आहे त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी असून, प्रकल्पामध्ये त्या वेळी ६७ हून अधिक कर्मचारी नव्हते. गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. कृपया, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.

गॅलेक्सीमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपाचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असून आणि तो अत्यंत दुर्दैवी असून, गॅलेक्सी सुरक्षेचे पालन करत आहे व त्यासाठी बांधील आहे. आम्ही पालन करत असलेले सुरक्षेचे मापदंड या श्रेणीतील सर्वोत्तम मापदंडांच्या तोडीचे आहेत. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, अशी दक्षता आम्ही घेऊ.

आपण सर्वांनी या स्पष्टीकरणाची दखल घ्यावी.

कळावे,
गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेडसाठी