शहरालगतच्या सहकारी औद्योगिक वसाहतील सुस्मित केमिकल कंपनीतील रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक कामगार पाय होरपळून जखमी झाला आहे.
आगीची माहिती मिळताच संजीवनी कारखान्याचे दोन अग्निशामक बंब सुरक्षा अधिकारी पी. एस. डुंबरे फौजफाटय़ासह काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने फोम, मेंथेनॉल फवारल्याने रौद्र रूप धारण करीत असलेली आग पाऊण तासात आटोक्यात आली. राहाता, शिर्डी, कोपरगाव पालिकेचेही अग्निशामक बंब येथे दाखल झाले होते.
या औद्योगिक वसाहतातील प्लॉट क्र. सी-१७ मधील किरण कुलकर्णी व उमेश हिंगडे (रा. येवला, जिल्हा नाशिक) यांचा अथरे अ‍ॅमिनो ड्रग इंटर मिडियट बनवण्याचा कारखाना आहे. तेथेच कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमध्ये हा स्फोट झाला. त्या वेळी येथे सात-आठ कर्मचारी काम करीत होते. त्यातील रामनाथ पवार या कामगाराचे पाय होरपळले. तो तसाच पळत बाहेर आल्याने त्याच्यासह अन्य कामगार बचावले. आग भडकत असताना संजीवनी कारखान्याचे अधिकारी डुंबरे मोठय़ा हिमतीने कारखान्याच्या आत गेले व तेथील डिझेलची टाकी तातडीने बाहेर काढली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार, ज्ञानेश पाटील, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.