News Flash

मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर

नदीच्या डोहात दुपारच्या वेळी डिटोनेटर्सचा स्फोट घडवून मेलेले मोठे मासे शिकारी नेत आहेत.

fishing
आमणापूर येथील कृष्णाकाठावर डिटोनेटरच्या स्फोटामुळे पाण्यावर पसरलेला मृत माशांचा तवंग. (छाया- संदीप नाझरे)

 

कृष्णेत जलप्रदूषणाबरोबरच माशांच्या प्रजननावर गंभीर परिणाम

मासेमारीसाठी डिटोनेटर्सचा वापर चोरटय़ा शिकारीकडून कृष्णाकाठावर केला जात असून यामुळे जलप्रदूषणाबरोबरच माशांच्या प्रजननावर गंभीर परिणाम होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. कृष्णा नदीकाठावर असलेल्या आमणापूर, राडेवाडी गावच्या पाणवठय़ावर डिटोनेटर्सचा स्फोट घडवून मासेमारी केली जात आहे.

नदीच्या डोहात दुपारच्या वेळी डिटोनेटर्सचा स्फोट घडवून मेलेले मोठे मासे शिकारी नेत आहेत. मात्र या स्फोटात मेलेले लहान एक किलो वजनापर्यंतचे मासे तसेच पाण्यावर तरंगत आहेत. यामुळे कृष्णा नदीच्या पृष्ठभागावर मृत माशांचा खच पाहण्यास मिळत आहे. मृत माशामुळे दरुगधी पसरल्याने आणि पाणी प्रदूषित झाल्याने जनावरेही पिण्यासाठी या पाण्याचा वापर टाळत आहेत.

याशिवाय डिटोनेटर्समधील अमोनियामुळे पाण्याशी रासायनिक प्रक्रिया होऊन याचा परिणाम माशांच्या प्रजननावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक पातळीवर विहीर खुदाईसाठी वापरण्यात येणाऱ्या काडतुसासाठी वापर करण्यात येणाऱ्या डिटोनेटर्सचा वापर मासेमारीसाठी होत असून या डिटोनेटर्सना स्थानिक पातळीवर केपा असे संबोधले जाते. याची विक्री ही ठरावीक ठिकाणीच परवानाधारक विक्रेत्यांकडूनच होत असल्याने प्रशासन अशा घातक वापरासाठी याचा विनियोग रोखू शकते. वन विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 1:47 am

Web Title: explosives using for fishing
Next Stories
1 राज्यात केरोसिनचा पुरवठा तीन वर्षांमध्ये निम्म्यावर!
2 हळदीची आवक वाढल्याने दर कोसळणार !
3 गाढव बाजाराला उतरती कळा!
Just Now!
X