News Flash

वायगाव हळदीची इंग्लंडला भुरळ!

युवा शेतकऱ्यांच्या प्रयोगाला यश; सर्वोत्कृष्ट औषध गुणधर्मामुळे २० टनांची निर्यात

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत देशमुख

वायगावच्या हळदीने इंग्लंडला चांगलीच भुरळ घातली असून इंग्लंडच्या एका कंपनीने तब्बल २० टन हळदीची मागणी नोंदवली. पाश्चिमात्य देशातही हळदीचे दूध पिण्याचा स्वास्थ्यविचार बळ धरीत असल्याने ब्रिटनकडून या हळदीची निवड करण्यात आली. या निर्यातीमुळे गावातील युवा शेतकऱ्यांच्या प्रयोगाला मोठेच यश लाभल्याचे मानले जात आहे.

देशात हळदीच्या चार वाणांना भौगोलिक मानांकन प्राप्त असून सर्वात आधी हा बहुमान वायगावी हळदीला प्राप्त झाला आहे. मोगलांच्या काळापासून उत्पादन होत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात गावातील युवा शेतकऱ्यांनी वायगावी हळद उत्पादक संघ स्थापन करून हळदीचे महत्त्व अधोरेखित केले. याच उत्पादक संघाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणले आहेत. दिल्लीस्थित अ‍ॅसवर्क अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क या कंपनीने उत्पादक संघाशी करार केला. या कंपनीमार्फत वायगावी हळद पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये दाखल होईल. यापूर्वी डिसेंबर महिन्यात कंपनीमार्फतच पाच टन हळद पाठवण्यात आली होती. पसंतीस उतरलेल्या हळदीला परत मागणी आली. करोना संक्रमण व त्यातून आलेले संकट यावर मात करीत उत्पादक संघाने हळद फुलवली. समुद्रपूर तालुक्यातील वायगावसह आठ गावातल्या दीडशे शेतकऱ्यांसह उत्पादक संघ कार्यरत आहे. त्यांनी या संकटकाळात शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रत्येकी वीस किलो बियाणे कुठलाच मोबदला न घेता दिले.

या हळदीतील कर्क्युमीन या मूलद्रव्याचे प्रमाण कायम राहण्यासाठी हळद प्रक्रियेचे तंत्र बदलले, असे उत्पादक संघाचे सचिव पंकज भगत यांनी सांगितले. या हळदीत भेसळ करून ती इतरत्र चढ्या भावात विकणाऱ्यांना अटकाव घालण्यासाठी येथील प्रत्येक हळद उत्पादकाला स्वतंत्र मानांकन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पंकज भगत सांगतात.

थोडी माहिती…

इतर हळदीच्या तुलनेत वायगावी हळद सर्वोत्कृष्ट औषध गुणधर्म असलेली हळद म्हणून ओळखली जाते. कर्करोग प्रतिबंधक कर्क्युमीन हे मूलद्रव्य या हळदीत मोठ्या प्रमाणात असतात. त्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिक्कामोर्तब केल्यावर ही हळद सोन्यासारखी झळाळली. २०१४ला तिला भौगोलिक मानांकन (जी. आय. इंडेक्स) प्राप्त झाले.

महत्त्व काय?

पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतले जाते. हळदीची चव, वास व रंग सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रमाणित झाले आहे. तेलाचे प्रमाण अधिक असणारी वायगावी हळद इतर हळदीच्या तुलनेत उजवी ठरली आहे.

औषधी गुणधर्मामुळे वायगावी हळदीला भविष्यात मोठी मागणी राहणार आहे. त्या दृष्टीने उत्पादनवाढीसाठी कृषी खाते प्रयत्नशील आहे. हळदीच्या कॅप्सूल व गोळ्या तयार करण्यासाठी दीड कोटींचे अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.  – डॉ. विद्या मानकर, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:27 am

Web Title: export of 20 tons of wayagaon turmeric due to its excellent medicinal properties abn 97
Next Stories
1 नाणार परिसरातील जमीन व्यवहारांबाबत आतापर्यंत ९ तक्रारी दाखल
2 वसई-विरार शहरात ६० दिवसांत ३३५ क्षयरोग रुग्ण
3 वसई-विरारमध्ये करोनामुळे होळीचा बेरंग
Just Now!
X