मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळून रविवारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. महामार्गावर दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना नसल्याने आता संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या सर्वेक्षणाची मागणी केली जाऊ लागली आहे.
कोकणात दरडी कोसळण्याच्या घटना काही नवीन नाहीत. गेल्या काही वर्षांत माळशेज घाट, आंबोली घाट, सुकेळी िखड, कशेडी घाट आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आजवर वाहतुकीस बाधा पोहोचवणाऱ्या या दरडी आता जिवघेण्या ठरू लागल्या आहेत. त्यामुळे या दरडींच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी किती जीवघेण्या ठरू शकतात, हे राज्याने यापूर्वीही अनुभवले आहे. मुंबईत २००० साली घाटकोपर येथे कोसळलेल्या दरडीत ६५ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर रायगड जिल्ह्यात २००५ मध्ये महाड-पोलादपूर परिसरात कोसळलेल्या दरडीने जवळपास २०० जणांचा बळी घेतला, अलीकडच्या काळात २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेत १३४ लोक दरडीखाली गाडले गेले. भूस्खलनाचा हा इतिहास लक्षात घेऊन या दरडींच्या समस्येला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
दरडी कोसळण्यामागे नसíगक आणि मानव निर्मित अशा दोन घटकांचा समावेश असतो. नसíगक घटकांमध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी, ढगफुटी, भूकंप यासारखे घटक कारणीभूत ठरतात, तर मानव निर्मित घटकांमध्ये डोंगर उतारावरील जंगलांची वृक्षतोड, उन्हाळ्यात जंगलांना लावले जाणारे वणवे, दगडखाणी, चुकीच्या पद्धतीने मातीचे उत्खनन यासारखे घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सातत्याने कोसळणाऱ्या दरडींचा भूवैज्ञानिकांच्या मार्फत अभ्यास होणे गरजेचे आहे. यातून दरडी कोसळण्याच्या संभाव्य कारणांचे नेमके पृथ:करण होऊ शकेल. भूवैज्ञानिकांच्या अहवालानंतर संभाव्य धोके टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होऊ शकेल.
महामार्गावर दरडी कोसळू नये म्हणून सध्या ठिकठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र मोठी दरड रोखून धरण्यात या जाळ्या कितपत उपयुक्त ठरतील हे सांगता येणे कठीण आहे. काल ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी जाळी नसल्याची बाब समोर आली आहे. द्रुतगती मार्गासाठी अनेक ठिकाणी डोंगर उभेच्या उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावरील मातीचे आणि वृक्षांचे आवरण नष्ट झाले आहे. त्यामुळे डोंगरांची दगड माती धरून ठेवण्याची क्षमताही नष्ट होत चालली आहे. पावसाच्या माऱ्याने दगड ठिसूळ होऊन खाली कोसळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थोडय़ा पावसातही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या संभाव्य दरडग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून धोकादायक भाग काढून टाकणे, आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक िभती उभारणे, या परिसरातील अतिवृष्टीवर लक्ष ठेवणे, धोकादायक भागाची पावसाळ्यात दैनंदिन पाहाणी करणे, संभाव्य धोके ओळखून वाहतूक वळवणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.