सोलापूर विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घोडेबाजाराला आलेला ऊत पाहता माकपने मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय तथा आदेश डावलून मतदान केलेल्या दोघा नगरसेवकांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.
माशप्पा विटे आणि महादेवी अलकुंटे अशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या दोघा नगरसेवकांची नावे आहेत. माकपचे प्रदेश सचिव, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी ही माहिती शनिवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार दीपक साळुंखे व महायुती पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक यांच्यात थेट लढत होऊन त्यात परिचारक यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य छोटय़ा पक्षांची मते फोडून विजय मिळवला होता. या वेळी घोडेबाजाराला ऊत येणार असल्याचा अंदाज घेऊन माकपने नतिकता जपत घोडेबाजारापासून दूर राहण्यासाठी मतदानच न करण्याचा निर्णय घेतला होता. तसा आदेश पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांना बजावण्यात आला होता. परंतु यापकी माशप्पा विटे व महादेवी अलकुंटे या दोघांनी पक्षादेश धाब्यावर बसवून मतदान केले. त्यामुळे पक्षाने गंभीर दखल घेऊन ही कारवाई केल्याचे आडम मास्तर यांनी नमूद केले.