पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडतीतून प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सोडतीमध्ये जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्याच विद्यार्थ्यांचे आतापर्यंत प्रवेश झाले असून, मुदतवाढीमुळे पालकांना कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मिळाला आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडतीद्वारे राज्यभरातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेशासाठी २६ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी त्यापैकी ३५ हजार २३७ विद्यार्थ्यांचा गुरुवापर्यंत प्रवेश झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या निम्मीच असल्याने उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांसह समाजवादी अध्यापक संस्थेचे प्रा. शरद जावडेकर आणि अन्य संघटनांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक सुनील चौहान यांनी पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ४ मेपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अ‍ॅपला प्रतिसाद नाही

यंदा प्रथमच आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालकांना मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या फेरीसाठी दोन लाख ४४ हजार ९३४ मुलांचे ऑनलाइन अर्ज आले असून, त्यापैकी जेमतेम ९४० पालकांनी मोबाइल अ‍ॅपचा अर्ज भरण्यासाठी वापर केला.

प्रवेशाबाबतची माहिती

प्रवेशाबाबतची माहिती https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.