नीरज राऊत

पश्चिम रेल्वेवर वैतरणा स्थानकाजवळील पुलाच्या भागात सुरू असलेले बेसुमार रेती उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश निरुपयोगी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्खननामुळे पुलास धोका निर्माण झाल्याचे अनेक पुरावे रेल्वेने सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दर ६९ दिवसांनी रेती उत्खनन व नौकानयन बंदी आदेश जारी केले जात आहेत. मात्र, त्याचा तसूभरही परिणाम झालेला नाही, असे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

गेली चार वर्षे बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. तरीही अवैध रेती उत्खनन आणि नौकानयन रोखण्यात प्रशासन यशस्वी ठरलेले नाही.  त्यामुळे पुलाला धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूल क्रमांक ९३ च्या उत्तरेकडील जमीन खचल्याने या पुलाला अतिरिक्त तुळई नव्याने बसविण्यात आली होती. ४ जून २०१६ रोजी पश्चिम रेल्वेने या पुलालगत अवैध पद्धतीने रेती उत्खनन होत असल्याने हे पूल धोकादायक झाल्याचे पत्र दिले. पालघरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ ऑक्टोबर २०१६ रोजी या दोन्ही रेल्वे पुलाच्या ६०० मीटर परिसरात रेती उत्खननावर बंदी घातली. पुलाखालून नौकानयन मार्ग बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाचे दर ६९ दिवसांनी नूतनीकरण करण्यात येते. परंतु, केवळ आदेश देण्याचेच काम जिल्हाधिकारी कार्यालयातून केले जात आहे.

याशिवाय पुलाजवळ अहोरात्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूल क्रमांक-९२ च्या काही गाळ्यांत  बहुलक जाळ्या (पॉलीनेट) बसवण्यात आल्या होत्या. मात्र, या जाळ्यांचा खालच्या बाजूचा आधार निखळून पडल्याने सध्या पुलाच्या खालून नौकानयन सुरू आहे.  गेल्या चार वर्षांत पुलाच्या ६०० मीटर अंतरात वावरणाऱ्या रेती उत्खनन बोटी जप्त करण्यात आलेल्या नाहीत वा एकाहीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची बाब काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे.

पुलाच्या सर्व बाजूंना ‘इन्फ्रारेड सीसीटीव्ही’ बसवण्याचे प्रस्तावित होते. तसा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने रेल्वे सुरक्षा मंडळाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याच वेळी बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या बोटचालकांना पकडण्यासाठी गस्ती नौका (स्पीड बोट) नसल्याचे निदर्शनास आले आहे.

जाळ्या निकामी

रेल्वे पूल क्र. ९२ व ९३ च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खनन व नौकानयन मार्ग वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रेल्वे पूल क्र.९२ च्या कार्यक्षेत्रातील मार्गाचा वापर रेती वाहतूक ट्रकसाठी करू देऊ नये यासाठी सूचना जारी केल्या आहेत. पूल क्रमांक ९२ला एकूण २१ गाळे असून किनाऱ्यालगतच्या गाळ्यांमध्ये नदीपात्र उथळ असल्याने तसेच लगतच्या काही गाळाच्या ठिकाणी खडक असल्याने या पुलाच्या गाळा क्रमांक १७ व १८ मधूनच नौकानयन करणे शक्य आहे. या दोन गाळ्यांच्या ठिकाणी अडथळे निर्माण करणे आवश्यक असून वर्षभरापूर्वी त्या ठिकाणी लावलेल्या जाळ्यांची देखभाल ठेवता न आल्याने सध्या त्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत.

दगड-मातीचा भराव

वैतरणा नदीतील उत्खननामुळे पश्चिम रेल्वेवरील पूल क्रमांक-९२ आणि ९३ जवळील भराव खचला आहे. त्यामुळे यातील एका पुलालगत नवीन तुळई (गर्डर) टाकण्यात आली आहे. याशिवाय पुलाला आधार म्हणून दगड-मातीचा भराव टाकण्यात आला आहे.