प्रबोध देशपांडे

पश्चिम वऱ्हाडात नेत्यांच्या आपसातील वादाची परंपरा कायम आहे. व्यक्तिगत अहम व स्वहितासाठी या नेत्यांना आपसात भिडण्यातही काही गैर वाटत नाही. शिवसेना खासदार भावना गवळी व भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादातून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

राजकारणात नेत्यांमधील वाद काही नवीन नाहीत. अनेक मोठय़ा नेत्यांमध्ये तीव्र तात्त्विक व वैचारिक मतभेद असतात. जनहिताच्या मुद्दय़ांवर मात्र ते विरोध बाजूला ठेवत एकत्र आल्याचेही असंख्य उदाहरणे आहेत. वऱ्हाडातील लोकप्रतिनिधींमध्ये हे विकासाचे राजकारणच दिसून येत नाही. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ात नेत्यांमधील हे वाद जनतेने अनेक वेळा अनुभवले आहेत. त्याचा जबर फटका विकास कामांनाही बसला. वऱ्हाडात गत अनेक दशकांपासून तेच-ते प्रश्न, समस्या कायम आहेत. त्यामुळे हा परिसर अविकसित म्हणूनच गणला जातो.

जिल्हय़ाच्या विकासाच्या मुद्दय़ावर एकजुटीने प्रयत्न होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यातच धन्यता मानली जाते. वाशीम येथील नियोजन भवनामध्ये प्रजासत्ताकदिनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व कारंजा मतदारसंघाचे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार वाद झाला. या वेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया देखील उपस्थित होते. दोन नेत्यांमधील वाद विकोपाला जाऊन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. भाजप कार्यकर्ते व शिवसैनिक ‘आमने-सामने’ आले. दोन्ही नेत्यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले, परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. या सर्व प्रकारावरून जिल्हय़ाची शांतता भंग झाली. नेत्यांच्या वादात भाजप कार्यकर्त्यांनी बंद पुकारून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकारही झाला. वास्तविक पाहता २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच खासदार गवळी व आमदार पाटणी यांच्यात बिनसले होते. त्यामुळे कालांतराने पाटणी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचा भगवा झेंडा हातात घेतला. भाजप-शिवसेना युतीच्या काळातही दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफुस होती. त्यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाईसुद्धा आहे. आता तर शिवसेना व भाजप परस्पर विरोधी पक्ष. त्यामुळे या नेत्यांमधील मतभेदाला पक्षांकडून अधिकृत बळ मिळाले. २६ जानेवारीला दोन्ही नेत्यांमधील मतभेद सर्वासमक्ष उफाळून आला. त्यामुळे वाशीम जिल्हय़ात शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र झाले. अकोला व बुलढाणा जिल्हय़ामध्येही वरिष्ठ नेत्यांमध्ये आपापसात मतभेदातून अनेक वेळा वाद झाले.

विकासासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.  नेत्यांमध्ये वाद होणे दुर्दैवीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विकासाच्या नावाने ओरड होत असते. त्या ठिकाणचे नेते विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र येतात. विदर्भातील नेत्यांनी ते शिकण्यासारखे आहे.

– सचिन कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, वाशीम.