रायगड जिल्ह्यात नेत्रदानासाठी समोर येणाऱ्या व्यक्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील तीन हजार व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानासाठी नोंदणी केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नेत्रदानाच्या या संकल्पातून जिल्ह्यात दोन वर्षांत १८० अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर नेत्रदान आणि अवयवदान याबद्दल सुरू असलेल्या जनजागृतीचे आता चांगले परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात दरवर्षी जवळपास १ हजार लोक मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत तीन हजार नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदानासाठी आपली नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत जिल्ह्यात मरणोत्तर ३४२ नेत्रपटल जमा करण्यात आले, यातून १८९ जणांवर बुब्बुळरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून त्यांना नवीन दृष्टी प्राप्त झाली. ही एक समाधानाची गोष्ट आहे. मानवाच्या मृत्यूनंतर काही तास त्यांचे अवयव जिवंत असतात. या काळात त्यांचे दान करणे गरजेच असते. दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या आणि कृत्रिमरीत्या अंधत्व आलेल्यांसाठी या अवयवांचा मोठा फायदा होता. त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याबाबतची तात्काळ सूचना जवळच्या शासकीय रुग्णालय अथवा या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संपर्क साधल्यास नेत्रपटल काढण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करता येऊ शकते. मात्र यासाठी जवळच्या नातलगांनी पुढाकार घेणे अपेक्षित असते. नेत्रदान करण्यापूर्वी नेत्रदात्याचे डोळे कोरडे होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेच असते. त्यासाठी डोळे ओले राहावेत यासाठी त्यावर ओला कापूस ठेवणे गरजेचे असते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना कृत्रिमरीत्या अंधत्व आले असते त्यांच्यासाठी हे नेत्रपटल अत्यंत उपयुक्त ठरतात, कारण अशा व्यक्तींवर केलेले बुब्बळरोपण शस्त्रक्रिया हमखास यशस्वी होतात. यातून ६० टक्के लोकांना नवी दृष्टी प्राप्त होते. रायगड जिल्हय़ात आजही २ हजार अंध व्यक्ती आहेत. त्यामुळे या अंधव्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जास्तीत जास्त नेत्रदात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. नेत्रदान सप्ताह घेण्यात येतो. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी, भित्तीपत्रके, मार्गदर्शन शिबीर, पथनाटय़ांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येते. जिल्हा रुग्णालयाच्याया उपक्रमात काही सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. यामुळे नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशिकांत थोरात यांनी सांगितले.

नव्या वर्षी केला त्यांनी नेत्रदानाचा संकल्प
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या वाहनचालक महेंद्र ऊर्फ मयूर महाडिक आणि त्याची पत्नी नवनीता या दोघांनी नव्या वर्षांची सुरुवात नेत्रदान करण्याचा संकल्प करून केली. पत्नीचा वाढदिवस कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी काही तरी वेगळं करण्याची मयूरची इच्छा होती. यातून नेत्रदान करण्याची कल्पना त्याला सुचली. विशेष म्हणजे कल्पनेला कृतीची जोड देऊन त्यांनी लागलीच जिल्हा रुग्णालयात जाऊन नेत्रदानाचा अर्जही भरला. आपल्या या कृतीतून इतरांनाही प्रेरणा मिळावी हीच अपेक्षा त्याने व्यक्त केली.