पुणे : करोना विषाणू संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी पुण्यातील व्हेंचर सेंटरने अनोखे ‘फेस शिल्ड’ तयार केले आहे. शहरातील जवळपास पाच ते सहा रुग्णालये आणि पोलिसांना हे फेस शिल्ड पुरवण्यात आले आहेत.  करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, करोनाग्रस्तांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठीच्या साधनांची रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांना सर्वाधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) व्हेंचर सेंटरने अभिनव ‘फेस शिल्ड’ची निर्मिती केली आहे. हेल्मेटच्या काचेसारखे दिसणारे हे फेस शिल्ड तोंडावर बांधता येत असल्याने संसर्गापासून बचाव करणे शक्य झाले आहे.

व्हेंचर सेंटर अंतर्गत असलेले दहा नवउद्यमी आणि व्हेंचर सेंटरचे कर्मचारी यांनी एकत्र येत पुणे फेस शिल्ड अ‍ॅक्शन ग्रुप स्थापन केला आहे. या चमूने ‘फेस शिल्ड’चा आराखडा तयार केला. व्हेंचर सेंटरच्या प्रोटोशॉपमध्ये ओएचपी शीट आणि एमडीएस यांचे लेझर कटिंग करून फेस शिल्ड तयार करण्यात आले. त्याला इलॅस्टिक लावण्यात आल्याने तोंडावर बांधून संसर्ग टाळता येऊ शकतो. फेस शिल्डला पुणे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पोलिस कर्मचाºयांसाठी तीन हजार फेस शिल्ड, तर काही रुग्णालयांकडूनही मागणी नोंदवण्यात आली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी व्हेंचर सेंटरचे प्रयत्न सुरू आहेत. फे सशिल्डची माहिती आणि आराखडा http://www.protoshop.in/covid19/ या संके तस्थळावर देण्यात आला आहे.

सध्या पुणे पोलिस आणि रुग्णालयांतील डॉक्टरांना मिळून जवळपास ३५०पेक्षा जास्त फेस शिल्ड देण्यात आली आहेत. फेस शिल्डची निर्मिती वाढवण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचा शोध घेण्यात येत आहे. एका फेस शिल्डसाठी सुमारे २५ रुपये खर्च येतो. या फेस शिल्डचा आराखडा सर्वांसाठी खुला करण्यात आला असून, त्याचा वापर करून कोणीही फेस शिल्डची निर्मिती करू शकेल.
– प्रेमनाथ वेणुगोपालन, संचालक, व्हेंचर सेंटर