साताऱा जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका फेसबुक पोस्टमधून जीवे मारण्यासंबंधी धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खंडाळा येथे उद्या (दि.४) होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह ४० हजार उपस्थितांना जीवे मारण्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस सतर्क झाले असून हा हॅकिंगचा प्रकार आहे का? याची चौकशीही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची सातारा जिल्ह्यात खंडाळा-किसन वीर साखर कारखान्यावर कार्यक्रम आणि नंतर जाहीर सभा आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा खात्मा करणार असल्याचाही उल्लेख आहे. याच पोस्टमध्ये ‘आय अॅम अजमल कसाब, कल अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा. २६/११ आतंकवादी हमला वैसे अब ऑपरेशन सातारा सीएम और ४०,००० लोग खल्लास. ४ फेब्रुवारी २०१९ खंडाला, सातारा इलेक्शन दौरा, ’असा पोस्टमधील मजकुराचा आशय आहे. रविवारी फेसबुकवरील एकाच्या फेसबुक खात्यावर ही पोस्ट दिसून आली. या पोस्टमध्ये एका पक्षाच्या कार्यक्रमाचे फोटोही दिसून आले आहेत. या पोस्टमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गुप्तचर यंत्रणाही तपासाला लागली आहे.

याशिवाय आणखी एक अशाच पद्धतीची मोठी पोस्ट फेसबुकवर संबंधिताच्या खात्यावर आहे. या सर्व प्रकाराची माहिती सातारा जिल्ह्यात पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ माहिती मिळवून चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी तपास सुरु असून रविवारी संध्याकाळपर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.