प्रशांत देशमुख

केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरणाच्या नियमांना मोडून बालकांना दत्तक देताना आर्थिक व्यवहार केला जात असून नागपूर जिल्ह्य़ात एका प्रकरणात महिला व बाल कल्याण विभागाकडून नुकतीच कारवाईही करण्यात आली. यात फेसबुक या समाज माध्यमाच्या आधारे बालकाची विक्री केल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

नागपूरमधील बुटीबोरी येथे करोना संचारबंदी काळात एका महिलेवर कौटुंबिक कलहातून सातत्याने शारीरिक व मानसिक अत्याचार झाले. त्याच दरम्यान पाच महिन्यांच्या या गरोदर महिलेला तिच्या नवऱ्याने घराबाहेर हाकलून दिले. अडचणीच्या स्थितीत ती परिसरातील एका महिलेकडे आश्रयास राहिली. प्रसूती झाल्यावर तिच्या संपर्कात एक जण आला. त्याने तिच्या दहा दिवसांच्या बाळाला एका संस्थेच्या माध्यमातून परस्पर विकले. ही बाब बाल कल्याण समितीच्या माध्यमातून निदर्शनास आल्यावर जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील मेसरे व नागपूरच्या माधुरी भोयर यांनी चौकशी सुरू केली. प्रथम पीडित महिलेला न्याय मिळून देण्यासाठी बुटीबोरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली. बाळाला पोलिसांनी परत मिळवून आईच्या स्वाधीन केले. आई आणि बाळ सध्या नागपूरच्या स्वाधार गृहात सध्या वास्तव्यास आहे. तक्रार झाल्यावर आरोपी पालकांनी फेसबुकच्या माध्यमातून बाळ दत्तक घेतल्याचे सांगितले. अशाच इतर काही प्रकरणातही चौकशी सुरू असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

होतेय काय?

दत्तक विधान हे केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरणाकडून नोंदणी झाल्यावरच अधिकृत ठरते. लेखी करारनाम्यामार्फत होणारी दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर असून त्यात कमीत कमी चार वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. असे असताना समाजमाध्यमांच्या आधारे बालकांना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत आहे.