केंद्र व राज्यातही सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने कॅन्टोन्मेंट निवडणूक ही स्थानिक पातळीवर गटबाजीची पर्वणीच ठरली आहे. पूर्वीच्याच या गटबाजीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर कॅन्टोन्मेंट निवडणुकीत अधिकच धार आली असून, त्याला शहरातील भाजप-शिवसेना युतीच्या राजकारणाचा नवा आयाम प्राप्त झाला आहे.
खासदार दिलीप गांधी आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर अशा अंतर्गत गटबाजीतच  कॅन्टोन्मेंट निवडणूक गाजते आहे. या निवडणुकीत गांधी स्वतंत्ररीत्या सक्रिय झाले असून, आगरकरांसह अन्य पदाधिकारी भाजप-शिवसेना युतीचा झेंडा घेऊन या निवडणुकीत उतरले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या राजकारणातील प्रचलित न्यायाने आगरकर व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड या निवडणुकीच्या निमित्ताने हातात हात घालून सक्रिय झाले आहेत. हे दोघेही युतीच्या प्रचारात आहेत, तर गांधी भाजपच्याच प्रचारात आहेत.
भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अनेक गट कार्यरत आहेत. आगरकर यांनी मागच्या वर्षभरात गांधी यांच्याशी जुळवून घेतले होते. लोकसभा निवडणुकीत ते गांधी यांच्या प्रचारात आघाडीवर होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोघेही पुन्हा परस्परांपासून दुरावले, ते इतके की विधानसभेची निवडणूक ज्यांच्या विरोधात लढवली ते माजी आमदार राठोड यांच्याशी आगरकर यांची जवळीक वाढली आहे. या दोघांच्या पुढाकारातूनच कॅन्टोन्मेंट निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली. विशेष म्हणजे राज्यात ही युती होण्याआधीच नगरला मात्र स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला होता.
विधानसभा निवडणुकीत नगर शहरातून पक्षाने आगरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यासाठी गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी इच्छुक होते. गांधी यांनी आगरकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता, मात्र अन्य इच्छुकांचीही नावे त्यांनी उमेदवारीसाठी सुचवली होती. पुढे निवडणुकीतही आपल्याला दगाफटकाच झाला, अशी आगरकर समर्थकांची भावना आहे. यातूनच गांधी व आगरकर यांच्यातील दरी वाढली आहे. कॅन्टोन्मेंट निवडणुकीच्या निमित्ताने ती ठळकपणे चव्हाटय़ावर आली, मात्र आगरकर-राठोड यांच्या जवळिकीने भविष्यात शहराच्या युतीअंतर्गत राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होते.