केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे बहुमत नसताना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, असा दावा कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. विरोधकांनी फडणवीसांना लक्ष्य केले. मात्र, हा दावा खोटा असून, निधीबाबत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अनंतकुमार हेगडे यांनी रविवारी कर्नाटकमधील एका सभेत बोलताना हा दावा केला होता. हा दावा फेटाळून फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, राज्याच्या वित्त विभागाने याची चौकशी करून सत्य लोकांपुढे आणावे, असे आवाहन फडणवीस यांनी राज्य सरकारला केले. चुकीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. बुलेट ट्रेनचे काम केंद्राच्या कंपनीकडून होत आहे. यात महाराष्ट्राचे काम फक्त भूसंपादनाचे आहे. त्यासाठी केंद्राने पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. बुलेट ट्रेनच नव्हे तर अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने कधीही केंद्राकडे पैशांची मागणी केली नाही, ना केंद्राने राज्य सरकारला पैसे दिले. ज्यांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांची लेखा पद्धती कळते त्यांना अशा प्रकारे पैसे देता आणि घेता येत नाही, याची माहिती आहे. त्यामुळे हेगडे यांचा आरोप चुकीचा आहे, आरोपांवर प्रतिक्रिया देणेही चुकीचेच आहे, असे फडणवीस म्हणाले.