माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सुमारे एक तास मनधरणी केली. मात्र हजारे यांचे समाधान झाले नाही. आता चर्चा, आश्वासने नकोत तर ठोस निर्णय घ्या, असे सांगत हजारे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बगाडे, खासदार भागवत कराड, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली हजारे यांची मनधरणी निष्फळ ठरली. चर्चेच्यावेळी महाजन, विखे यांच्यासह शिरूरचे (पुणे) माजी आमदार बाबूराव पाचार्णे उपस्थित होते.

शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेतली.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घेऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. मात्र पत्रात ठोस काहीही नाही त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

हजारे यांच्या मागण्या समजावून घेतल्या आहेत. त्यांच्या काही मागण्यांसंदर्भात केंद्राने यापूर्वीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री, पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून त्यांच्यापर्यंत हजारे यांचे म्हणणे पोहोचवून हजारे यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.