मोदी सरकारपेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारचे काम चांगले आहे असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. मी जनतेच्या हक्कांसाठी मोदी सरकारकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून न्याय मागितला. मात्र माझ्या पत्रव्यवहाराची मोदी सरकारने दखल घेतली नाही. असं असलं तरीही आपण आपलं काम करत रहायचे ही माझी पद्धत आहे असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. मात्र मोदी सरकारपेक्षा फडणवीस सरकारचे काम निश्चित चांगले आहे कारण राज्य सरकारने दखल घेत लोकायुक्त कायदा करण्यासाठी १० जणांची समिती नेमली आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
देशातील मोदी सरकारपेक्षा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याकडून चुका झाल्या तर आपण त्यांनाही सुनावू असेही हजारे यांनी म्हटले आहे. पुण्यातील यशदा येथे नवीन लोकायुक्त कायदा बनवण्यासंदर्भात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीआधी प्रसारमाध्यमाशी बोलताना अण्णा हजारे अनेक विषयांवर भूमिका मांडली.
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी अनेक वेळा सरकारकडे पत्रव्यवहार केला. पण त्याबाबत दखल घेतली गेली नाही. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, केंद्र सरकारकडून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झाली. पण त्यानंतर लोकायुक्त कायद्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाही. यासाठी आंदोलनाचे अस्त्र उगारताच राज्य सरकारकडून लोकायुक्त कायद्यासाठी समिती नेमली असून त्या कामाला सुरुवात होणार आहे. लोकायुक्त कायदा हा क्रांतिकारी ठरणारा आहे. यामुळे माहिती अधिकाराचा फायदा शेवटच्या घटकाला झाला आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 4:02 pm