देशात एकीकडे करोना संसर्ग वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे सर्व सामान्यांना आरोग्य सुविधा मिळवण्यात अडचणींना सामोरं जाव लागत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शनसह लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या देशात ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सरू आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असूनही त्याने दुसऱ्यांदा लस टोचवून घेतल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या फडणवीसांवर जोरादार सोशल मीडियावर निशाणा साधला जात आहे.

”देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का? जर नाही तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला? रेमडेसिवीरप्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लस तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत, मात्र फडणवीस कुटुंब सुरक्षित आहे.” असं एकाने म्हटलं आहे.

तर, अन्य एकजण उपरोधिकपणे म्हणाला आहे की, आपल्याला देवेंद्र फडणवीस व तन्मय फडणवीस यांना धन्यवाद दिलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे केंद्र सरकारला आज १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घ्यावा लागला.

जेव्हा सर्वसाधरण लोकं लसीच्या एका डोससाठी धडपडत आहेत, तेव्हा राजकारण्यांच्या नातेवाईकांना दुसऱ्यांदा लस मिळत आहे. ज्यांचे वय ४५ वर्ष पेक्षा जास्त देखील नाही.अशी देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.