सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातलं वातावरण तापलं आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे! – भाजपा

फडणवीस म्हणाले,“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ” असं फडणवीस म्हणाले आहेत.

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!

“ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं उघडकीस येत आहेत. यामधून पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला दिसत आहे. आज ही घटना म्हणजे याचा कळस आहे. दुर्देवाने इतक्या वाईट प्रकारे,  ही सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर, आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीत गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. ही चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली पाहिजे, त्यांना केंद्रीय यंत्रणा मान्य नसतील या ठिकाणी कोर्ट मॉनिटर अशाप्रकारची चौकशी झाली पाहिजे. पण जो पर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत हा  सगळा जो विषय आहे. हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे. महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल, ज्याचं एवढं नाव आहे. त्या पोलीस दलाला एकप्रकारे बदनाम करणारा हा सगळा प्रकार आहे. म्हणून आमची मागणी आहे, याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि यातलं तथ्य बाहेर येईपर्यंत गृहमंत्री जर आपल्या पदावर राहिले, तर याची चौकशी कशी होऊ शकेल? हा कुणी साधारण  व्यक्तीने केलेला आरोप नाही, म्हणून आम्हाला असं वाटतं की याप्रकऱणी तत्काळ कडक कारवाई झाली पाहिजे. ” असं देखील फडणवीस यांनी सांगितलं आहे.

परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळत केलेल्या ट्विटबाबात बोलताना फडणवीस म्हणाले,  “अशाप्रकारचं उत्तर त्यांनी देण्या ऐवजी या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्ट नैतिक भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या संदर्भात कारवाई करून, जे काही ते बोलत असतात ते कृतीत उतरून दाखवलं पाहिजे. मला याचं देखील आश्चर्य वाटतं की, जर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस हे आणलेलं असेल, तर त्याच्यावर त्यांनी तत्काळ कारवाई करायला हवी होती. कदाचित आपलं सरकार वाचवण्याच्या नादात किंवा यातून आपलं सरकार जाऊ शकतं, असा संशय आल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलं असेल, पण अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं, म्हणजे राज्य धोक्यात टाकणं आहे. म्हणून मला असं वाटतं की तत्काळ ही कारवाई झालीच पाहिजे.”