मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काल बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली. या बंद दाराआड चर्चेवरून राज्यात राजकीय चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना याबाबत माहिती देत, स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यात केवळ ओबीसी आरक्षणाबाबतच चर्चा झाली, अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

फडणवीस म्हणाले, “हे खरच आहे. ती सगळ्यांसमोर झाली आहे ती काय लपून छपून झाली नाही. त्या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकीच्या नंतर हॉलच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे. तिथे दहा मिनटं आम्ही चर्चा केली, ती चर्चा देखील ओबीसी आरक्षणाबाबतच होती. जे बैठकीत झालं त्याबाबत मी काही मत बैठकीत मांडलं होतं, ते मी पुन्हा त्यांना सांगितलं की, अशाप्रकारे आपण केलं तर तीन-साडेतीन महिन्यात आपण ओबीसींचं राजकीय आरक्षण परत करू शकतो. त्यावर ते म्हणाले तुम्ही सहकार्य करा, मी म्हणालो आम्ही संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. याव्यतिरिक्त काही आमची चर्चा झालेली नाही.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहातील बंद दालनात १५ मिनिटे चर्चा झाली होती. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती.

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं भाजपा-शिवसेना युतीबाबत मोठं विधान, म्हणाले…

तर, आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या बंद दाराआड चर्चेवरून, आज भाजपा-शिवेसेना युतीबाबत मोठं विधान केल्याचं दिसून आलं. “या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. मात्र या दोघांच्या चर्चेमुळे कदाचित पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतात.” असं आठवलेंनी म्हटलं आहे.