माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी सरकारने काही शेतकऱ्यांना १४ ते १८ लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचा फडणवीस यांचा दावा दिशाभूल करणारा असून फडणवीस यांनी ज्यांना १४ ते १८ लाख भरपाई दिली, त्यांची नावे जाहीर करावीत, असे खुले आव्हान शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिले आहे.

गेल्या २९ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत पत्रपरिषदेत सदोष बीटी उपरोक्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विजय जावंधिया यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली, तेव्हा कुण्याही शेतकऱ्याला अशा स्वरूपाची भरपाई मिळाल्याचे ऐकिवात नाही, असे जावंधिया यांचे म्हणणे आहे.

पत्रपरिषदेत सोयाबीनच्या सदोष बियाण्यांच्या प्रश्नावर परखड भूमिका व्यक्त केली. आपण विरोधी पक्षात असताना कापसाला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी मागणी केली होती. सध्या मोदी सरकारच्या काळात कापसाचा हमी भाव ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपये क्विंटलचाच आहे. आपण या पत्रकार परिषदेत बियाणे कायद्यात शेतकऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद कशी आहे, याची माहिती दिली. सदोष बियाणांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई फक्त बियाणे देऊनच नाही, तर एकरी उत्पादनाबाबत प्रचारात संबंधित बियाणे कंपनीने त्याला हमी भावाने गुणाकार करून येणारी रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी आपण केली आहे. ही मागणी करताना तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१८ मध्ये सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना १४ ते १८ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई त्यावेळी सरकारने मिळवून दिली, हा दावा तुम्ही केला. तो सिद्ध करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी नावे जाहीर करावीत, अशी मागणी विजय जावंधिया यांनी  फडणवीस यांच्याकडे केली आहे.