राज्याच्या जीएसटीच्या थकबाकीवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रोहित पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिलेल्या उत्तराला रोहित पवार यांनी सोशल मीडियात सविस्तर पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे.

फेसबुकवर लिहिलेल्या सविस्तर पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “नेहमी अभ्यास करुन बोलणाऱ्या नेत्याने अभ्यास न करताच माझ्यावर टीका केल्याचं मला आश्चर्य वाटलं. सध्या ते बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे त्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. माझ्या त्यांच्याएवढा अभ्यास नसेल पण मी वस्तुस्थिती मांडली होती. आत्ता मी पुन्हा स्पष्टीकरण देतोय ते नाराजीतून नाही तर वस्तूस्थिती समोर यावी म्हणून तसेच राजकीय टिकाटिपण्णी होऊ नये म्हणून हे लिहितोय. फडणवीस यांनी पुन्हा एकदा जीएसटी भरपाई कायदा अभ्यासून कॅलक्युलेश समजून घ्यावं. जनता त्यांच्याकडे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बघते.”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना त्यांनी एक सल्लाही दिला. रोहित पवार म्हणाले, “मला या विषयावर राजकारण करायचं नाही. पण आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्राकडून याबाबत भरपाई देण्यात उशीर होत आहे. राज्यासमोर मोठं आर्थिक संकट असताना दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपली चूक सुधारण्याची संधी असते. त्यामुळे त्यांनी जीएसटी भरपाईची मागणी केंद्राकडे लावून धरावी आणि ती मान्य करुन घ्यावी.”

रोहित पवार यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर टीका केली होती. त्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन कळत नाही त्यांनी अभ्यास करुन बोलावं असं उत्तर दिलं होतं. त्याविरोधात राोहित पवार यांनी सोशल मीडियात सविस्तर पोस्ट लिहून पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.