साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात होते. पण, मोदी न दिसल्याने बरीच उलटसुलटं चर्चा होत आहे. या तर्कविर्तकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमध्ये पूर्ण विराम देणारा खुलासा केला.

भाजपाची महाजनादेश यात्रा सातऱ्यातून सोमवारी कराडमध्ये दाखल झाली. यावेळी सत्यजित देशमुख यांचा भाजपा प्रवेश आणि मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद झाली. उदयनराजे भोसलेही यावेळी उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात होते, पण ऐनवेळी दिसले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान घटनात्मक पद आहे. राजकीय प्रवेशाच्या कार्यक्रमांना पंतप्रधानांना उपस्थित राहता येत नाही. तसा प्रोटोकॉल (शिष्टाचार) आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी उदयनराजे यांच्या प्रवेशाला हजर राहू शकले नाहीत. मात्र, मोदी यांनी उदयनराजेंच स्वागत केलं आहे. तसेच भेटायलाही बोलवलं आहे. १९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी उदयनराजे यांची भेट होणार आहे”, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

शरद पवारांनी विचार करावा-

शरद पवार यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यारही फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले, “पवारांनी मताचं राजकारण करू नये. लोकशाही धोक्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगू नये. लोकशाही मार्गाने निवडून आलेली कितीतरी सरकारे बरखास्त करण्याचा इतिहास त्यांनी लक्षात ठेवावा. कलम ३७० रद्द करून देशाला एकसंघ करणारा निर्णय मोदी सरकारने घेतला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यासमर्थनार्थ मतदान करता आलं असत पण केलं नाही. ते कलम ३७० च्या बाजूचे की विरोधातले हे पवारांनी सांगाव”, असा सवाल करत फडणवीस म्हणाले, “पवार यांनी कोणतही वक्तव्य करताना विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूश होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पण पवारांच्या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावला.