संभाजी पाटील-निलंगेकर यांचे प्रतिपादन; आश्वासनपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

लातूरमध्ये वर्षांनुवर्षे एकाच पक्षाची सत्ता होती. काँग्रेसचा पराभव करू शकू, असा विश्वास कोणामध्येच नव्हता. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने द्यायची, पण त्याची पूर्तता होत नव्हती. भाजपच्या माध्यमातून नागरिकांना पर्याय आणि नवा विश्वास मिळाला आणि मतदारांनी काँग्रेसला जिल्ह्य़ात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत धडा शिकविला, असे मत पालकमंत्री आणि लातूरमधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. लातूरकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लातूर महानगरपालिका निवडणुकीत यश प्राप्त करायचेच, या जिद्दीने गेल्या काही महिन्यांपासून कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्यासाठी विविध उपक्रम राबवले व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला अन् त्याची फलश्रुती विजयात झाली याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.

लातूर जिल्हा स्थापनेच्या पूर्वीपासून या जिल्हय़ावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. विरोधकांची शक्ती अतिशय तोकडी होती. जिल्हय़ात अनेक इमारती बांधल्या गेल्या. त्या इमारती म्हणजेच विकास अशी धारणा लोकांची झाली होती. लातूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, शैक्षणिक शहर म्हणून लागणारी सुरक्षा, शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले. हे प्रश्न सुटले पाहिजेत असे वाटत असले तरी वर्षांनुवष्रे याबाबतीतील आश्वासने निवडणुकीच्या निमित्ताने ऐकायची. पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकायचा तो पुढील निवडणुकीपर्यंत. या विश्वासाला तडा देण्याचे काम वारंवार होत गेले. मात्र जनतेसमोरही पर्याय नव्हता. विरोधकांच्या मनात आपण काँग्रेसचा पराभव करू शकू, हा आत्मविश्वासच कधी जागृत झाला नाही.

जिल्हय़ाचे पालक मंत्रीपद मिळाल्यानंतर एका मागोमाग एक निवडणुकांचे सत्र सुरू झाले. प्रारंभी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करीत निवडणुकीत यश मिळविले. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इतरांना स्वप्नवत वाटणारा विजय प्राप्त केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ही बडय़ांची मक्तेदारी असा समज मोडून काढीत सामान्य कार्यकर्त्यांला पदावर बसवले. त्यातून जनतेत वेगळे वातावरण तयार झाले. लातूर शहरात भाजपची संघटनात्मक स्थिती खिळखिळी होती. मागील निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आलेला नसल्यामुळे आपण जिंकू शकू हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत नव्हता. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने दोनशे कार्यकर्त्यांचे तीन दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर घेतले. त्या प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह निर्माण झाला व आपण जिंकू शकतो ही भावना तयार झाली, असे संभाजी निलंगेकर म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून आपण लातूरमध्ये ठाण मांडले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधत व अन्य पक्षांतील इच्छुकांना पक्षप्रवेश देत वातावरणनिर्मिती केली. या निवडणुकीत शहरातील मूलभूत प्रश्नांना हात घालत हे प्रश्न आता आम्ही सोडवून दाखवू, असा विश्वास जनतेला दिला. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा अतिशय लाभ झाला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांमार्फत केले गेले होते. त्याचाही लाभ निवडणुकीत झाल्याचे निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

प्रस्थापितविरोधी व्यूहरचना कामी आली..

  • ग्रामीण जनता भाजपसोबत आहे. आपण शहरी भागातील लोकदेखील भाजपच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शहरातील घराणेशाहीच्या कारभाराला मूठमाती देऊन एकदा भाजपला संधी देऊन पाहू या हा विचार रुजवला.
  • जनतेने संधी देऊनही काँग्रेसच्या आमदारांनी मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जिंकण्याचे तंत्र आपल्याला अवगत आहे त्यामुळे आपला कोणी पराभव करू शकत नाही या धुंदीत ते वावरले.
  • नेमकी त्यांची ही दुखरी नस लक्षात घेऊन आपण निवडणुकीची व्यूहरचना केली अन् शून्यावरून चक्क बहुमताच्या जागा मिळविण्यापर्यंत मजल मारली. आता निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने आपण वाटचाल सुरू केली आहे.
  • लातूर मनपाचे यश हे भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाचे आहे. ते कोणा एकटय़ा-दुकटय़ाचे नाही हे सांगायलाही निलंगेकर विसरले नाहीत.