राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील २९ चालकांनी रंग आंधळेपणाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक विभागीय कार्यालयातील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी नाना मोरे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मोरे यांनी चौकशी केली असता त्यात साक्री आगारातील १७, शिरपूर, शहादा, शिंदखेडा प्रत्येकी तीन, नवापूर दोन, अक्कलकुवा व धुळे आगारातील प्रत्येकी एक, याप्रमाणे ३० चालकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी करून रंगांधळेपणाचे बनावट प्रमाणपत्र महामंडळ प्रशासनाला सादर केले होते. तत्कालीन विभाग नियंत्रक, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी तपासणी केलेल्या ३० पैकी २९ चालकांनी बनावट प्रमाणपत्र मिळविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये नितीन बोरसे, जितेंद्र गुजर, राजेंद्र नागपुरे आदींसह तत्कालीन विभागीय अधिकारी अनिल वळवी, तत्कालीन विभाग नियंत्रक अविनाश पाटील, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांचा समावेश आहे.