21 March 2019

News Flash

साताऱ्यात बनावट नोटा छापणारे रॅकेट उध्वस्त; ५६ लाखांच्या चलनासह ६ जणांना अटक

त्यांच्याकडून ५६ लाख ४२ हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी सातारा शहरातील आहेत.

संग्रहित छायाचित्र

सातारा शहरातील कोटेश्वर मंदीर परिसरात दोन हाजाराच्या व पाचशे रूपयाच्या बनावट नोटा स्वत: छापून त्या बाजारपेठेत खपविण्याचा प्रयत्न करणारे रॅकेट सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केले आहे. त्यांच्याकडून ५६ लाख ४२ हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी सातारा शहरातील आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनिकेत प्रमोद यादव (रा. नविन एमआयडीसी, सातारा) व अमोल अर्जुन शिंदे (रा. गडकर आळी, सातारा) हे दोघे कोटेश्वर मंदीर परिसरात बनावट नोटा बाजारात चालवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पो. नि. पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि विकास जाधव यांच्या पथकाला कारावाईच्या सुचना देण्यात आल्या.

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या आरोपींच्याकडे २६ लाख ५४ हजार पाचशे रुपयांच्या संपूर्ण छापलेल्या बनावट नोटा तर २९ लाख ८८ हजारांच्या अर्धवट छापलेल्या नोटा, अशा एकूण ५६ लाख ४२ हजार पाचशे रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मुख्य सुत्रधार गणेश भोंडवे, अमोल शिंदे, अनिकेत यादव, अमेय बेलकर, राहूल पवार व अन्य एक अशा सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी शुक्रवार पेठेत असलेल्या गणेश आर्पाटमेंटमध्ये नोटा छापत होते.

दोनच दिवसांपूर्वी सांगलीत बनावट नोटा चालवणार्‍या गौस गब्बर मोमीन याला नोटा पुरवल्याप्रकरणी शुभम खामकरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी बाजारपेठेत दोन हजार व पाचशे रूपयांच्या बनावट नोटा चालवणारे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उध्वस्त केले. त्याचबरोबर १ लाख ३३ हजार ५०० रूपये किमतीची वाहने व मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

First Published on June 14, 2018 4:04 pm

Web Title: fake currency racket demolish at satara arrested six people including 56 lakh fake currency seized