सामूहिक बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे वाई न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले. पाचगणी येथील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी देण्याच्या खोटे आश्वासन देऊन पुण्याहून पाचगणीला जात असताना २७ जुलै २०१९ रोजी पसरणी घाटात रेशीम केंद्र रस्त्यावर मोटारीत दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार १८ जानेवारी २०२० मध्ये वाई पोलिसात एका महिलेने नोंदविली.

तथापी तपासा दरम्यान पोलिसांना आढळले की, आरोपींपैकी एक जण गुन्ह्याच्या दिवशी भारताबाहेर होता, तर दुसरा पुण्यात होता. तसेच ज्या मोटारीमध्ये बलात्कार केल्याचे महिलेने सांगितले ती मोटार गुन्ह्याच्या एक वर्ष आधी विकण्यात आली होती. गुन्ह्याच्या दिवशी ही गाडी नांदेडमध्ये असल्याची माहिती तपासात समोर आली.

गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात बी-सारांश अहवाल दाखल केला. तक्रारदाराने दाखल केलेला गुन्हा चुकीचा व द्वेषपूर्ण असल्याचे निष्कर्ष तपास अधिकारी यांनी काढला व अंतिम अहवाल सादर केला. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या बी-सारांश अहवालाला महिलेने विरोध दर्शविला व एफआयआरमध्ये तिने केलेल्या तक्रारींचा पुनरुच्चार केला. न्यायालयाने मात्र राज्य गुन्हे अन्वेषण अहवालाचा विचार केला आणि परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालय, मुंबईच्या अहवालाच्या आधारे, आरोपींपैकी एक जण खरोखरच परदेशात असल्याचा निष्कर्ष काढला.

पोलिसांना स्वतंत्रपणे कायदेशीर कारवाई करण्याची मुभा असल्याचे मत व्यक्त करून महिले विरोधात गुन्हा नोदविण्याचे निर्देश न्या व्ही एन गिरवलकर यांनी दिले. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी केला. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.

महिलेने दिलेली तक्रार आणि सत्य परिस्थिती यामध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात ‘ब’ नावाने समरी वाई न्यायालयात दाखल केली. त्यानुसार महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने न्यायालयाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्या प्रमाणे वाई पोलीस आता तपास करत आहेत..
अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक,सातारा