महावितरणच्या ठेकेदाराकडून फिर्याद
महावितरणच्या ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व चौघा तोतया पत्रकारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. राज्यभर या पूर्वी अनेक तोतया पत्रकार पकडले गेले. पण शहरातील ही पहिलीच घटना आहे.
महावितरणचे ठेकेदार सागर राजकुमार तलवार यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बहुजन टायगर फोर्सचा अध्यक्ष संजय रुपटक्के (रा. जनता विद्यालयामागे ), अंकुश उर्फ अंतोन मरतड शेळके (रा. गिरमेवस्ती), प्रविण बाबुराव सांगळे ( रा. वार्ड नं. ७) अरुणराज त्रिभुवन (रा. गळिनब, ता. श्रीरामपूर) यांच्या विरुध्द खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ठेकेदार तलवार हे अभियंता असून विजेचे खांब उभे करण्याचा ठेका ते घेतात. त्यांच्याकडे चौघांनी खंडणी मागितली होती. जर ४ लाख रुपये दिले नाही तर मंत्रालयात तक्रार करुन काम बंद पाडू तसेच तु कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. तो उघडकीला आणू अशी धमकी दिली होती. यापूर्वी तलवार यांनी त्यांना खंडणी दिली होती. तोतया पत्रकारांचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे यांच्याकडे तक्रार केली होती. शुक्रवारी रात्री ८ वाजता चौघांनी त्यांना बसस्थानकानजिकच्या एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे तलवार यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारली. यावेळी बसस्थानकानजिक असलेल्या पोलिस पथकांनी छापा टाकून तोतया पत्रकारांना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा तलवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. चौघांनाही अटक करण्यात आली आहे. फिर्यादी तलवार यांनी काहींना फिर्यादीतून वगळले असल्याचे समजते. मात्र सीसीटीव्हीमध्ये त्यांचे छायाचित्रण आले आहे. अधिक तपास पोलिस करित आहे.